कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास एटीएसकडे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास एटीएसकडे

उच्च न्यायालयाकडून पानसरे कुटुंबियांची मागणी मान्य

मुंबई : कोल्हापूरात कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या होऊन अनेक वर्षांचा कालावधी उलटला असला तरी अजूनही, आरोपींचा शोध लागलेला नाही. त्यामुळे पानसरे या

बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी
राज्यात विरोधात, आणि ‘या’ ठिकाणी भाजप – महाविकास आघाडी आली एकत्र
नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता यांचे निधन

मुंबई : कोल्हापूरात कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या होऊन अनेक वर्षांचा कालावधी उलटला असला तरी अजूनही, आरोपींचा शोध लागलेला नाही. त्यामुळे पानसरे यांच्या हत्येचा तपास राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्याची पानसरे कुटुंबियांची मागणी उच्च न्यायालयाने बुधवारी मान्य केली. पानसरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, कन्नड अभ्यासक एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासात एटीएसनेच धागेदोरे शोधले होते. एटीएसने 2020 मध्ये औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणात काही जणांना अटक केली होती. त्यातून या चारही हत्यांचे सूत्रधार सारखेच असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे पानसरे यांच्या हत्येचा तपास एटीएसकडे देण्याची मागणी कुटुंबियांनी केली होती. या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यास कोणताही आक्षेप नसल्याचे राज्य सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील अशोक मुंदरगी यांनी सांगितल्यावर न्यायालयाने प्रकरणाचा तपास एटीएसकडे वर्ग करण्यात आल्याचे स्पष्ट केले. प्रकरणाच्या तपासात एटीएसच्या अधिकार्‍यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) विशेष तपास पथकाचे (एसआयटी) अधिकारी सहकार्य करतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणी काही आरोपी अटकेत असून पानसरे यांच्यावर हल्ला करणारे दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पानसरे यांच्या कुटुंबियांनी याआधी तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे देण्याची मागणी केली होती. त्यानंतर सरकारने प्रकरणाचा तपास सीआयडी एसआयटीतर्फे करण्यात येईल असे स्पष्ट केले होते. परंतु एसआयटीच्या तपासावर नाराजी व्यक्त करून पानसरे कुटुंबीयांनी प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने पानसरे कुटुंबियांच्या मागणीची यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान दखल घेऊन पानसरे यांची हत्या करणार्‍या मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यात विशेष तपास पथक अपयशी ठरले आहे. त्यामुळे प्रकरणाचा तपास एटीएसकडे वर्ग करण्याच्या पानसरे कुटुंबीयांच्या मागणीवर राज्य सरकारला काही तरी निर्णय घ्यावाच लागेल, असे सरकारला सुनावले होते. त्याचबरोबर पानसरे कुटुंबियांच्या मागणीवरील निर्णयाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते.

COMMENTS