धुळे : धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात 2024 ची निवडणूक शांततेत पार पडली आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान 20 नोव्हेंबर 2024 रोज
धुळे : धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात 2024 ची निवडणूक शांततेत पार पडली आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान 20 नोव्हेंबर 2024 रोजी व मतमोजणीची 23 नोव्हेंबर 2024 रोजी प्रक्रिया पार पडली. यानंतर सोशल मीडियावर धुळे ग्रामीण मतदार संघातील अवधान मतदान केंद्रातील आकडेवारीबाबत अफवा व नागरिकांची दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत शहानिशा केल्यावर ती अफवा असून फेक न्यूज व्हायरल करून चुकीची माहिती समाजात पसरवली जात असल्याची माहिती 06 – धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी रोहन कुवर यांनी दिली आहे. नागरिकांनी अफवा, चुकीच्या व दिशाभूल करणार्या फेक न्यूजवर विश्वास ठेऊ नये. असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी रोहन कुवर यांनी केले आहे.
सोशल मीडियावर सोमवार 25 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळपासून धुळे ग्रामीण मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांना अवधान मतदान केंद्रावर शून्य मते मिळाली असून त्या जोडीला एका फेक व्हीडीओ क्लिपचा वापर करून शून्य मते मिळाल्याने आंदोलन सुरू आहे असे भासविण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. प्रशासनाकडे ही बाब आल्यावर तिची शहानिशा, खातरजमा करण्यास सुरूवात झाली. त्यानुसार धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात अवधान येथे 247, 248, 249, 250 असे एकूण चार मतदान केंद्र होते. त्यातील मतदानाच्या आकडेवारीनुसार मतदान केंद्र क्रमांक 247 वर काँग्रेसच्या उमेदवारास 227, मतदान केंद्र क्रमांक 248 वर काँग्रेसच्या उमेदवारास 234, मतदान केंद्र क्रमांक 249 वर काँग्रेसच्या उमेदवारास 252 व मतदान केंद्र क्रमांक 250 वर काँग्रेसच्या उमेदवारास 344 मते मिळाली आहेत. अवधान येथे चार मतदान केंद्रावर तीन मते नोटासह एकूण 2 हजार 881 मतदान झाले. त्यात काँग्रेसच्या उमेदवाराला एकूण 1 हजार 57 मते मिळाली व भाजपचे उमेदवार राघवेंद्र उर्फ रामदादा पाटील यांना एकूण 1741 मते मिळाली आहे. प्राप्त वस्तुस्थिती पाहता सोशल मीडियावर अवधान मतदान केंद्रावर काँग्रेसच्या उमेदवाराला शून्य मते मिळाली असा खोडसाळ, अफवा पसरविणारा, चुकीचा व दिशाभूल करणारा संदेश पसरविला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा फेक न्यूजला, आंदोलनाच्या फेक व्हीडीओला प्रतिसाद देऊ नये व अफवा पसरू नये. तसेच असा बोगस संदेश व्हायरल करू नये, अफवांना बळी पडू नये, असे आवाहनही धुळे ग्रामीण मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी रोहन कुवर यांनी केले आहे.
COMMENTS