मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली मंत्रालय कर्मचाऱ्यांशी भेट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली मंत्रालय कर्मचाऱ्यांशी भेट

मुंबई : गतिमान कारभार करताना अधिकाधिक पेपरलेस काम आणि तंत्रज्ञानाचा उपयोग कसा वाढेल ते पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. मुख्यम

Dhule : पुराच्या पाण्यात एकजण वाहून गेला .. शोधकार्य सुरू
लोकल च्या मोटर कोचच्या डब्याला लटकला होता तरुण,अचानक हात सटकला अन्…|
घटस्थापनेला राज्यभर आनंदोत्सव साजरा करत देवाच्या दर्शनाला जाणार- भाजपची घोषणा (Video)

मुंबई : गतिमान कारभार करताना अधिकाधिक पेपरलेस काम आणि तंत्रज्ञानाचा उपयोग कसा वाढेल ते पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातल्या काही विभागांना आज भेटी दिल्या तसेच कर्मचाऱ्यांशी चर्चा करून ई टपाल, पेपरलेस कामकाज प्रणाली विषयी सूचना केल्या व अडचणी विचारल्या. यावेळी कर्मचाऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करताना एका दिव्यांग कर्मचाऱ्याची त्यांच्यासमवेत छायाचित्र घेण्याची इच्छाही पूर्ण केली आणि त्याची विचारपूसही केली. अशा प्रकारे थेट विभागांना भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांशी बोलणारे मुख्यमंत्री विरळाच अशी प्रतिक्रियाही अनेकांनी व्यक्त केली. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना फुलं वाहून अभिवादन केले.

बाबासाहेबांवरील प्रदर्शन कायमस्वरूपी हवे
यावेळी पुराभिलेख संचालनालय यांच्यातर्फे मंत्रालय त्रिमूर्ती प्रांगणात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर एक सुंदर प्रदर्शन लावण्यात येत आहे, त्यांच्या तयारीची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. हे प्रदर्शन कायमस्वरूपी इंदू मिल येथील स्मारकस्थळी पण लावा अशी सूचना करून मुख्यमंत्र्यांनी प्रदर्शनातील बाबासाहेबांचा दस्तावेज तसेच पत्रे, जुनी छायाचित्रे यांची उत्सुकतेने पाहणी केली व सूचनाही केल्या. यावेळी त्यांच्या समवेत मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, अतिरिक्त मुख्य सचिव साप्रवि डॉ संजय चहांदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पोलीस आयुक्त संजय पांडे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

कर्मचाऱ्यांशी थेट चर्चा
त्रिमुर्ती प्रांगणातील प्रदर्शनाची तयारी पाहून मुख्यमंत्री प्रथम मंत्रालयातील विस्तारित इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सामाजिक न्याय विभागाच्या कर्मचाऱ्यांना भेटले. त्याठिकाणी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त केलेल्या सजावटीचे त्यांनी कौतुक केले तसेच बाबासाहेबांच्या प्रतिमेचेही पूजन केले. कर्मचाऱ्यांशी बोलून त्यांच्या कमाविषयीही त्यांनी माहिती घेतली.

यानंतर मुख्यमंत्री महसूल विभाग तसेच सामान्य प्रशासन विभाग, गृह विभाग, विधी व न्याय अशा विभागात प्रत्यक्ष आतमधून फिरले. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी मुख्य सचिवांनी मंत्रालयात 6 एप्रिलपासून फाईल्स आणि कागदपत्रे यांचे संगणकीकरण तसेच स्वच्छता, अनावश्यक कागदपत्रांची विल्हेवाट याची मोहीम सुरु असल्याची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी देखील पेपरलेस कामांवर भर देताना तंत्रज्ञानाचा जास्तीतजास्त उपयोग करावा अशा सूचनाही केल्या. मुख्यमंत्र्यांनी संकल्प कक्ष तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील कक्षांना देखील भेट देऊन पाहणी केली व कामकाजाविषयी महत्वपूर्ण सूचना केल्या

कर्मचाऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी
मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनीही आपल्या भेटीस आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी दाखविलेल्या आपलेपणामुळे व प्रत्यक्ष कामकाजाविषयी केलेल्या सुचनांमुळे उत्साह दुणावल्याची प्रतिक्रिया गृह विभागातील कर्मचारी अश्विनी राम धावणे यांनी दिली. याच विभागातील प्रगती विकास मोरे यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी, ‘कशा काय बऱ्या आहात ना?’ अशा शब्दांत विचारपूस केली. विधि व न्याय विभागातील सहायक कक्ष अधिकारी प्रियंका गावडे व त्यांच्या सहकारी म्हणाल्या, आमच्या विभागाला भेट देणारे मुख्यमंत्री ठाकरे पहिलेच मुख्यमंत्री असावेत. त्यांनी अगदी साधेपणाने विचारपूस केली. कामाची चौकशी केली. त्यांच्या भेटीने आम्हाचाही उत्साह वाढला आहे. त्यांनी पहिल्याच वर्षी जागतिक महिला दिन- 8 मार्च रोजी आम्हा सर्वांना आपुलकीने पत्र आणि फुल देऊन आश्चर्यचकीत केले होते. त्यांची आजची भेटही अशीच आश्चर्यचकीत करणारी आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्यमंत्री व मंत्री आस्थापनेच्या कक्ष अधिकारी श्रीमती कल्याणी धारप व संगीत गुल्हाने म्हणाल्या, मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या विभागाला भेट देणे ही गोष्ट छान वाटली. त्यांनी आमच्याकडच्या लेजर बुक्स पाहून त्याविषयी बारकाईने जाणून घेतले.

COMMENTS