मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात रविवारी मान्सूनपूर्व सरी कोसळल्यामुळे मोठे नुकसान झाले असून, वीज पडून अनेकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्या

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात रविवारी मान्सूनपूर्व सरी कोसळल्यामुळे मोठे नुकसान झाले असून, वीज पडून अनेकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच आता अरबी समुद्रात चक्रीवादळसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
संभावित चक्रीवादळामुळे कोकणसह महाराष्ट्र आणि गुजरातला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हवामान खात्याने मच्छिमारांना मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे. यंदाच्या हंगामातील मान्सून मालदीवसह दक्षिण भारत आणि श्रीलंकेत दाखल झाला आहे. त्यानंतर आता अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर मध्य भारतात कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. त्यामुळे येत्या सात जून पर्यंत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. स्कायमॅट, क्युवेदर आणि मुंबई विभागाच्या हवामान खात्यानेही जूनच्या दुसर्या आठवड्यात चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र तसेच गुजरातच्या किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ हे अनेकदा महाराष्ट्र किंवा गुजरातकडे सरकण्याऐवजी ओमानकडे सरकत असते. अनेकदा अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ समुद्रातच विरून जाते. परंतु यावेळी अरबी समुद्रात तयार होत असलेले चक्रीवादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या दिशेने सरकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जूनच्या दुसर्या आठवड्यात अरबी समुद्रात चक्रीवादळ आल्यास मुंबई, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी भागांत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं किनारी भागातील नागरीक आणि मच्छिमारांना सतर्क राहण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. चक्रीवादळाचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
COMMENTS