Homeताज्या बातम्यादखल

सत्तेपेक्षा वेळ साधणाऱ्या शरद पवारांना शह म्हणजे शक्ती !

सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याची घाई हा विषय केवळ व्यक्तीगत राजकारणापुरता मर्यादित राहिलेला नाही. तो सध्या महाराष्ट्रातील सत्तासमीकरणे,

BEED : बीड नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “तिरडी”आंदोलन ! (Video)
महाराष्ट्राचे राजकारण : विचारधारेचा अंत की सत्तेची नशा?
राजकीय गोडवा वाढणार का?

सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याची घाई हा विषय केवळ व्यक्तीगत राजकारणापुरता मर्यादित राहिलेला नाही. तो सध्या महाराष्ट्रातील सत्तासमीकरणे, पक्षांतर्गत संतुलन आणि आगामी राजकीय रणनिती यांचा एक सामा‌ईक आरसा ठरत आहे. प्रश्न असा आहे की, ही घाई नेमकी कशासाठी? राजकारणात सत्तेचं केंद्रीकरण आणि विश्वासाचं वर्तुळ निर्माण करण्याला नेहमीच प्राधान्य दिले जाते. सध्याच्या अस्थिर राजकीय वातावरणात सत्ता टिकवण्यासाठी केवळ बहुमत पुरेसं नसतं; तर निर्णायक पदांवर पूर्ण विश्वासू चेहरे असणं आवश्यक ठरतं. सुनेत्रा पवार यांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे येणं हे याच दृष्टीने पाहावं लागेल. अजित पवार यांच्या पश्चात त्यांच्या कुटूंबाला जनमानसात सध्या सहानुभूती असल्याचे चाणाक्ष राजकीय नेत्यांना लक्षात आले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या पश्चात त्यांच्या गटाला सत्तेत आपली पकड अधिक घट्ट करायची असल्यास घरातील व्यक्तीवर विश्वास ठेवणं हा ‘राजकीय सुरक्षिततेचा’ मार्ग मानला जातो. यातून पक्षांतर्गत संदेश जातो की अजितदादा पवार यांच्या पश्चात देखील पक्षावर त्यांच्या कुटुंबाची हुकूमत आहे; शिवाय, निर्णय प्रक्रिया अजून ही केंद्रित आहे. उपमुख्यमंत्रीपदासारखं महत्त्वाचं पद घरात ठेवल्याने कार्यकर्ते आणि नेत्यांना एक स्पष्ट इशारा जातो—निर्णय केंद्रित आहेत, आणि सत्ता वाटपाबाबत फारशी मोकळीक नाही. हे नेतृत्व मजबूत करतं, पण त्याचवेळी असंतोषाचं बीजही यातून पेरली जाऊ शकतात!  भविष्यातील राजकीय वारसा देखील यातून विनायासे स्पष्ट होऊन जातो. महाराष्ट्राच्या राजकारणात घराणेशाही हा शब्द टीकेचा विषय असला, तरी प्रत्यक्ष व्यवहारात तो वारंवार दिसतो. सुनेत्रा पवार यांना मोठ्या पदावर आणणं म्हणजे पवार कुटुंबाचा राजकीय वारसा अधिकृतपणे पुढे नेण्याची तयारी. आजचा निर्णय हा उद्याच्या समीकरणांची पायाभरणी ठरू शकतो. अर्थात, सत्तेच मुख्य संचलन करणाऱ्यांना यातून विरोधी कंपूत घबराट निर्माण करण्याची एक आयती संधी मिळते! त्यांना  कोंडीत पकडता येतं. अशा निर्णयामुळे विरोधकांना ‘घराणेशाही’चा मुद्दा उचलण्याची संधी मिळते, पण त्याचवेळी सत्ताधारी गटाला प्रशासनावर पकड वाढवण्याची मुभा मिळते. हा धोका पत्करण्याची तयारी म्हणजे सत्तेची गरज टीकेपेक्षा मोठी मानली गेली आहे, असं म्हणावं लागेल. मात्र या घाईचं दुसरंही एक अंग आहे लोकशाही मूल्यांची कसोटी यातून पणाला लागते. जनतेला प्रश्न पडतो की, अनुभव, कामगिरी आणि जनादेश यांना किती महत्त्व दिलं जातंय? की सत्ता टिकवणं हेच अंतिम ध्येय ठरत आहे? हे प्रश्न आज नाहीतर उद्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी येणारच. थोडक्यात, सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यामागची घाई ही भावनिक नव्हे, तर अत्यंत थंड डोक्याने आखलेली राजकीय चाल वाटते. ती सत्ता स्थिर ठेवू शकते, पण जनतेच्या मनात निर्माण होणाऱ्या शंका आणि अस्वस्थता दुर्लक्षित करून चालणार नाही. कारण शेवटी, राजकारणात सत्ता महत्त्वाची असली तरी विश्वास गमावण्याची किंमत अधिक मोठी असते.
    या घडामोडीत शरद पवारांच्या राजकारणाला शह देण्याची बीजं दडलेली आहेत का हा प्रश्न अतिशय रास्त आहे—आणि उत्तर सरळ “नाही” किंवा “हो” असं नसून यात दोन्ही शक्यता समसमान असू शकतात!  शरद पवार यांचं राजकारण हे नेहमीच व्यक्तीपेक्षा संस्था, कुटुंबापेक्षा पक्ष, आणि भावनेपेक्षा वेळेची अचूक निवड यावर उभं राहिलेलं आहे. त्यामानाने सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याची घाई ही थेट कुटुंबकेंद्रित राजकारणाचा संकेत देते. हेच पवारसाहेबांच्या राजकीय शैलीला छेद देणारं ठरतं आणि इथंच “शह” देण्याचा प्रयत्न दिसतो. दुसरा मुद्दा म्हणजे नैतिक अधिष्ठान. शरद पवार यांनी  घराणेशाहीचा उघडपणे आग्रह धरलेला नाही, किमान थेट सत्तेच्या पदांबाबत तरी. त्यामुळे दिवंगत अजितदादा पवार गटाकडून असा निर्णय झाला, तर शरद पवारांच्या गटाला “आम्ही वेगळे आहोत” हा नैतिक दावा करण्याची संधी मिळते. पण उलटपक्षी, पवार कुटुंबाचंच नाव पुढे येत असल्याने सामान्य जनतेच्या नजरेत दोन्ही गट एकाच माळेचे मणी वाटण्याचा धोका आहे. हाच धोका शरद पवारांच्या राजकारणाला शह देऊ शकतो. तिसरं आणि कदाचित सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळेचं राजकारण. शरद पवार यांची ताकद नेहमी दीर्घकालीन डावपेचात राहिली आहे. अजित पवार गटाने जर आत्ता आक्रमक पवित्रा घेतला, सत्ता-केंद्रित निर्णय घेतले, तर अल्पकालीन फायदा मिळू शकतो; पण यामुळे शरद पवारांना संयम, अनुभव आणि लोकशाही मूल्यांचा चेहरा अधिक ठळकपणे उभा करण्याची संधी मिळते. म्हणजेच, शह देण्याच्या नादात उलट “ओपनिंग” देण्याची शक्यता अधिक. अजित पवारांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीतील जुन्या, निष्ठावंत नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली, तर त्याचा नैसर्गिक फायदा शरद पवार गटालाच होतो. पवारसाहेबांचं राजकारण नेहमीच दुरून पाहणं आणि योग्य वेळी हस्तक्षेप या सूत्रावर चाललेलं आहे. त्यामुळे थेट शह बसण्याऐवजी हा डाव त्यांच्यासाठी उलट संधी ठरू शकतो.‌ सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यामागील घाईत शरद पवारांच्या राजकारणाला शह देण्याचा प्रयत्न नक्कीच दिसतो, पण तो शह अंतिम मॅट ठरण्यापेक्षा धोकादायक आक्रमण ठरण्याची शक्यता जास्त आहे. कारण शरद पवार यांचं राजकारण हे सत्तेवर नव्हे, तर वेळेवर विश्वास ठेवणारं आहे. आणि राजकारणात वेळ सत्तेपेक्षा जास्त निर्दयी असते.

COMMENTS