जात व्यवस्था व्यवहारातून संपवायची असेल, तर तिचे उच्चाटन सर्वप्रथम माणसाच्या मनातून झाले पाहिजे, असे ठाम मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ

जात व्यवस्था व्यवहारातून संपवायची असेल, तर तिचे उच्चाटन सर्वप्रथम माणसाच्या मनातून झाले पाहिजे, असे ठाम मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. पूर्वी व्यवसाय आणि कामाच्या स्वरूपावरून जातींची निर्मिती झाली. कालांतराने त्या समाजव्यवस्थेला चिकटल्या आणि पुढे त्यातून जातीभेदाची भावना वाढत गेली. आजच्या काळात हा भेद प्रामुख्याने अहंकारातून निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जातिभेद संपवण्यासाठी प्रत्येकाने ‘जात न पाहण्याची’ मानसिक सवय लावून घ्यावी लागेल. समाजाने हा बदल प्रामाणिकपणे स्वीकारला, तर पुढील दहा ते बारा वर्षांत जातीभेद संपुष्टात येऊ शकतो, असा विश्वास डॉ. भागवत यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समाजातील प्रबुद्ध नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आयोजित प्रमुख जनसंगोष्ठीत ते बोलत होते. या वेळी उपस्थित नागरिकांनी लेखी स्वरूपात विविध प्रश्न व शंका मांडल्या. त्या सर्व प्रश्नांना सरसंघचालकांनी सविस्तर आणि स्पष्ट उत्तर दिले. कार्यक्रमाला प्रांत संघचालक अनिल भालेराव यांची उपस्थिती होती. प्रारंभी विजय राठी यांनी प्रास्ताविक केले. अहिल्याताई धायगुडे व छत्रसाल पांडव यांनी वैयक्तिक गीत सादर केले, तर केतकी जोशी यांच्या स्वरातील कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रश्नोत्तराच्या सत्रात बोलताना डॉ. भागवत म्हणाले की, संघ हे व्यक्तीघडणीचे कार्य करतो; त्यापलीकडे संघाचा कोणताही हेतू नाही. संघ कोणत्याही प्रतिक्रियेतून निर्माण झालेले संघटन नाही, तसेच त्याची कोणाशीही स्पर्धा नाही. सर्व समाजाच्या सहभागातून भारताला परम वैभवाच्या दिशेने नेणे, हेच संघाचे ध्येय आहे. संघाला स्वतः मोठे होण्याची इच्छा नसून, समाजाला मोठे करण्याचा संकल्प आहे. समाजातील एखादे संघटन उभारण्याऐवजी संपूर्ण समाजाचे संघटन घडवणे, हे संघाचे कार्य असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात अशी वेळ यावी की समाज संघाच्या विचारांनी प्रेरित होऊन काम करेल आणि तेव्हा संघाची स्वतंत्र ओळख उरणार नाही-हीच संघाची अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संघ समजून घ्यायचा असेल, तर संघाच्या शाखेत सहभागी व्हावे, असे आवाहनही सरसंघचालकांनी यावेळी केले.

COMMENTS