Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर रवळगावला बससेवा सुरू

ढोल-ताशा, गुलाल उधळत ग्रामस्थांचा जल्लोष कर्जत : प्रहार जनशक्ती मोर्चाने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली एसटी बससेवा अ

संस्कृतीमध्ये भाषा व कलांचा मोठा वाटा : हांडे
हिंदू हा विश्वातील सर्वात प्राचीन धर्म : ह.भ.प. राऊत
तालुक्यातील शेअरधारकांना वेठीस धरल्यास ‘अंबालिका’ सुरू होऊ देणार नाही : महेंद्र धांडे

ढोल-ताशा, गुलाल उधळत ग्रामस्थांचा जल्लोष

कर्जत : प्रहार जनशक्ती मोर्चाने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली एसटी बससेवा अखेर रवळगावमध्ये सुरू करण्यात आली. मिरजगाव ते शिवाचा मळा, रवळगाव, कोंभळी, खांडवी, भोसा, पीर फाटा या मार्गावरील बससेवा सुरू होताच ग्रामस्थांनी आणि प्रहार जनशक्ती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात व गुलाल उधळत जल्लोषात स्वागत केले.

रस्त्याची कामे अपूर्ण असल्याचे कारण पुढे केले जात होते. ठेकेदारांकडून काम पूर्ण झाल्यानंतरही बस सुरू न झाल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ११ फेब्रुवारी रोजी मिरजगाव येथील क्रांती चौकात रस्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी विमलताई अनारसे आणि दत्तात्रय तनपुरे यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती. मात्र आंदोलनावर ठाम राहिल्यामुळे अखेर एसटी महामंडळाला बससेवा सुरू करावी लागली.

बस गावात दाखल होताच ग्रामस्थांच्या वतीने चालक व वाहकांचा सत्कार करण्यात आला. शितल बनकर, रंजना बनकर आणि प्रमिला तनपुरे यांनी बसची पूजा करून स्वागत केले. अनेक पिढ्यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसत होता.यावेळी विमल अनारसे म्हणाल्या, “या भागातील शाळकरी मुले, महिला, वृद्ध, आजारी व्यक्ती आणि शेतकऱ्यांसाठी ही बससेवा अत्यंत गरजेची होती. सर्वसामान्यांच्या मागणीकडे कोणी लक्ष दिले नाही. त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. नोटिसांना आम्ही भीक घालत नाही. जनतेसाठी कितीही वेळा आंदोलन करावे लागले तरी माघार घेणार नाही.”

दत्तात्रय तनपुरे म्हणाले, “या भागातील नागरिकांचे अनेक वर्षांचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. मोठ्या नेत्यांना ही बस सुरू करता आली नाही, मात्र प्रहार संघटनेच्या माध्यमातून ही सेवा सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी ही सेवा बंद करू नये, अन्यथा पुन्हा आंदोलन करण्यात येईल.” त्यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले.

कार्यक्रमास अक्षय खेडकर, सुभाष खेडकर, तात्या खेडकर, सुनील खेडकर, नगर दक्षिणचे दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष बबनराव म्हस्के, अशोक जाधव, अशोक कांबळे, सचिन तनपुरे, जनार्दन तनपुरे, नामदेव बनकर, तुकाराम बनकर, संतोष खेडकर, उत्तम बनकर आदी उपस्थित होते.

COMMENTS