ब्राह्मण समाज प्रतिनिधी-शरद पवार भेटीचा अन्वयार्थ !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

ब्राह्मण समाज प्रतिनिधी-शरद पवार भेटीचा अन्वयार्थ !

शरद पवार यांंची ब्राह्मण जातीच्या अनेक संघटनांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की, ब्राह्मण जातीच्या वीस पेक्षा अधिक संघटना

अहमदनगरमध्ये क्रूर पित्याने पोटच्या दोन मुलांना विहिरीत फेकलं
येथील भाजी मार्केटमध्ये मित्राने केली मित्राची हत्या I LOKNews24
सर्वसामान्यांच्या विकासासाठी शिवछत्र परिवार कटिबध्द -विजयसिंह पंडित

शरद पवार यांंची ब्राह्मण जातीच्या अनेक संघटनांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की, ब्राह्मण जातीच्या वीस पेक्षा अधिक संघटना महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत. आजपावेतो महाराष्ट्राला असे वाटत होते की, ब्राह्मण समाज हा सामाजिक पातळीवर एकसंघ आहे; वास्तवात ते खरे नाही. हे खरे आहे की, ब्राह्मण ही वर्णजात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत राहून आपल्या कार्यकक्षा विस्तारीत करित असतात. साधनांची मुबलकता किंवा सहज उपलब्धता, समाजात सांस्कृतिक पातळीवर ब्राह्मण जातीला त्यांनी पारंपरिक पातळीवर मिळवून घेतलेला सन्मान यामुळे या जातीसमुहाला इतर जातीसमुहांच्या तुलनेत संघर्ष फारसा करावा लागत नाही! शिवाय शासन-प्रशासनात माणसांची झालेली पेरणी – जी शरद पवारांच्या शब्दांत सांगायचं तर आवश्यकतेपेक्षा अधिक प्रतिनिधित्व – यामुळे त्यांना संघर्ष तसा नाहीच्या बरोबरच करावा लागतो. हे देखील तितकेच खरे की, ब्राह्मण जात समुदाय पुरोगामी आणि परिवर्तनाच्या क्षेत्रात देखील आघाडीवरच राहीलाय. काॅंग्रेसपासून ते कम्युनिस्ट आणि समाजवादी पक्ष संघटनांचे नेतृत्वही त्यांच्याकडेच राहीले. एवढेच कशाला प्राचीन काळात बुध्दाच्या भिक्षूसंघातही त्यांनीच सर्वप्रथम प्रवेश घेतला. एवढं सगळं असूनही समाजात ब्राह्मण जातीला आज आपल्यावर अन्याय होतो आहे असे का वाटते, याचा विचार करणे आवश्यक आहे. सर्वात महत्वपूर्ण बाब म्हणजे ब्राह्मण जातीला आजपर्यंत खूप काही मिळाले असले तरी ते फक्त आम्हालाच मिळावं आणि मिळत रहावं, ही त्यांची एक मानसिकता राहीली. त्यामुळे, अध्यात्मिक किंवा धर्माच्या क्षेत्रात एक तत्व सांगितले जाते की, आम्ही जे करतो ते आपल्या बाबतीत कधी ना कधी घडणारच. आम्हाला मिळावं इतरांना मिळू नये, असा विचार करणारा ब्राह्मण समाज हे विस्मरणात नेतो की, इतरांना देऊ नये अथवा मिळू नये, असा विचार करणाऱ्या ब्राह्मण समाजालाच जेव्हा काही मिळू नये अशी परिस्थिती समाज निर्माण करतो तेव्हा त्यांना अन्याय झाल्यासारखे वाटू नये. काल, शरद पवारांची भेट घेणाऱ्या ब्राह्मण समाजाच्या प्रतिनिधींनी आम्हाला आरक्षण मिळत नसेल तर ते इतर समाजालाही देऊ नये, अशी मागणी केल्याचे खुद्द पवारांनी मिडिया समोर सांगितले. याचाच अर्थ स्वतःसाठी न्याय मागण्याच्या भूमिकेत जाणाऱ्या ब्राह्मण समाज प्रतिनिधींनी इतर समाजावर अन्याय करित राहण्याची मानसिकता कायम ठेवली असल्याचे यातून स्पष्ट होते. राष्ट्रवादी पक्षाचे काही नेते ब्राह्मण समाजाविरोधात बोलतात अशी तक्रार घेऊन पवारांच्या भेटीला जाणारे ब्राह्मण प्रतिनिधी इतर जाती समुहांच्या विरोधात भूमिका घेतात, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले. राष्ट्रवादी पक्षात ब्राह्मण जातीविरोधात कोणी बोलल्याचे जाणवले नाही. मिटकरी ब्राह्मण जाती विरोधात बोलले नाहीत, त्यांनी पुरोहितांच्या भूमिकेवर मिश्किल टिपणी केली; जितेंद्र आव्हाड सारखे नेते ब्राह्मण जातीविरोधात बोलत नाहीत, तर सामाजिक – सांस्कृतिक भूमिका मांडताना ते इतिहास स्पष्ट करतात. याउलट राष्ट्रवादी चे अनेक नेते संभाजी भिडे यांचे भक्त आहेत. ज्या संभाजी भिडेंवर भीमा कोरेगाव येथे झालेल्या दगडफेक हल्ल्यासंदर्भात महाराष्ट्राला अद्यापही संशय आहे. अशा नेत्यांच्या संदर्भात ब्राह्मण समाज प्रतिनिधी कधी पुढे आल्याचे आम्ही ऐकले नाही.
देशातील सर्व विचारधारांचे नेतृत्व करणारा ब्राह्मण समाज फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच नेतृत्व करायला का धजत नाही, हा खरा प्रश्न आहे. अर्थात फुले-शाहू-आंबेडकर यांच नाव घेणारे पवार हे काही त्या विचारांच नेतृत्व करतात, असं खात्रीशीर सांगता येणार नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. ब्राह्मण समाज अन्याय आपल्यावर होत असल्याचे गाऱ्हाणी घेऊन येतो तेव्हा त्यांनी सध्या लोकशाही व्यवस्था धोक्यात आल्याचे जे देशभर बोलले जाते आणि त्यासाठी ब्राह्मण हितरक्षणाचा कोअर विचार करणारा आर‌एस‌एस जबाबदार असल्याची चर्चा लोक करतात तेव्हा ब्राह्मण समाज प्रतिनिधी समोर येऊन भूमिका का घेत नाही, हा खरा प्रश्न आहे. आम्ही अन्याय करत राहू पण त्याला न्याय म्हणून गृहीत धरा असा तर ब्राह्मण समाजाचा विचार नाही ना, एकदा ते स्पष्ट होणे गरजेचे आहे. शरद पवार हे पुरोगामी असले तरी सामाजिक न्याय करणारे आहेत, असा विश्वास त्यांच्याविषयी अद्यापही महाराष्ट्राला वाटत नाही. अशावेळी ब्राह्मण समाज प्रतिनिधी आणि शरद पवार यांची भेट म्हणजे नव्या सामाजिक अन्यायाची सुरूवात असेल का, अशी चिंता मनाला भेडसावून जाते. तरीही, सामाजिक बदल अथवा परिवर्तन हे होतच राहणार कारण ते निसर्गाचे तत्व आहे!

COMMENTS