नाशिक - रक्तदान हे प्रत्यक्ष जीवनदान असून प्रत्येक पात्र व्यक्तीने ऐच्छिक रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन महानगरपालिक
नाशिक – रक्तदान हे प्रत्यक्ष जीवनदान असून प्रत्येक पात्र व्यक्तीने ऐच्छिक रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी केले. नाशिक महानगरपालिकेच्या 41 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ.करंजकर बोलत होते.
यावेळी महापालिकेचे प्रशासन उपायुक्त श्रीकांत पवार, विभागीय रक्त संक्रमण अधिकारी डॉ. पुरूषोत्तम पुरी, विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश गरूड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.तानाजी सावंत, डॉ.कल्पना कुटे, डॉ. अजिता साळुंखे, डॉ. प्रशांत भुतडा, डॉ. प्रशांत शेटे, डॉ. दिपक पाटील, डॉ अतुल सोनवणे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी विभागीय रक्त संक्रमण अधिकारी डॉ. पुरूषोत्तम पुरी आल्या मनोगतात म्हणाले, एखाद्या संस्थेचा वर्धापन दिन म्हणजे त्या संस्थेचा वाढदिवसच असतो. स्वत:चा , लग्नाचा, आई-वडीलांचा, मित्रांचा व गुरूजनांचा वाढदिवस रक्तदान करून प्रत्येकाने साजरा करावा. अशा प्रकारे बर्थडे ब्लड डोनेशन क्लब- वाढदिवस रक्तदान ही अभिनव संकल्पना वर्धिष्णू करता येवू शकते असे मत डॉ. पुरी यांनी यावेळी मांडले.
‘मिशन ब्लड: नो शॉर्टेज नो वेस्टेज’ या अभियानांतर्गत शासकीय रक्तपेढी, विभागीय संदर्भ सेवा रूग्णालय व बिटको रूग्णालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात एकूण 81 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राजक्ता लेले यांनी केले तर डॉ. अतुल सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. असे विभागीय संदर्भ सेवा रूग्णालय,नाशिक चे मुख्य रक्त संक्रमण अधिकारी यांनी कळविले आहे.
COMMENTS