लखनौ : उत्तरप्रदेश राज्य भाजपच्या हातून निसटले आहे. या राज्यात समाजवादी पार्टीने जोरदार मुसंडी मारत चांगल्या जागा मिळवल्या आहेत. रामजन्मभूमी असले
लखनौ : उत्तरप्रदेश राज्य भाजपच्या हातून निसटले आहे. या राज्यात समाजवादी पार्टीने जोरदार मुसंडी मारत चांगल्या जागा मिळवल्या आहेत. रामजन्मभूमी असलेल्या अयोध्या (पूर्वीचे फैजाबाद) लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला आहे. या जागेवर समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद निवडून आले. त्यांनी भाजपचे लल्लू सिंह यांचा 48,104 मतांनी पराभव केला. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
फैजाबाद हा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ समजला जातो. सुरुवातीच्या काळात काँग्रेसने इथे सलग चार वेळा विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतर कधीही या मतदारसंघात कोणत्याही एका पक्षाला सलग विजय मिळालेला नाही. नरेंद्र मोदी यांच्या लाटेत भाजपने 2014 आणि 2019 साली पहिल्यांदा हा मतदारसंघ सलग दोनदा जिंकला. यावेळी हॅटट्रिक करण्याची संधी भाजपला होती. अयोध्येत राममंदिराच्या उभारणीमुळं पुन्हा एकदा ती संधी मिळेल अशी भाजपची अपेक्षा होती. मात्र, ती अपेक्षा फोल ठरली. भाजपकडून या जागेवर लल्लू सिंह हे निवडणूक लढवत होते. इथं काँग्रेस व सपाच्या आघाडीचे उमेदवार अवधेश प्रसाद मैदानात होते. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेर्यांपासूनच अवधेश प्रसाद यांनी लल्लू सिंह यांच्यावर आघाडी घेतली होती. ती शेवटपर्यंत कायम राखली. राजकीय जाणकारांच्या म्हणण्यानुसार, जातीय समीकरण आणि अयोध्येच्या विकासासाठी ज्या पद्धतीने जमीन संपादित करण्यात आले, त्यामुळे लोकांमध्ये नाराजी होती. यासोबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उठवलेला आरक्षण आणि संविधान बदलाचा मुद्दा प्रचारात चालला. याशिवाय कमकुवत झालेला बहुजन समाज पक्ष आणि या पक्षाची मतपेढी इंडिया आघाडीकडं वळवण्यात सपा व काँग्रेसला आलेलं अपयश याचा फटका भाजपला पडल्याचे दिसत आहे
COMMENTS