नांदेड । प्रतिनिधीनांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, नांदेड महानगरच्या वतीने आयोजित बुद्धिजीवी कार्यकर्त्या

नांदेड । प्रतिनिधी
नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, नांदेड महानगरच्या वतीने आयोजित बुद्धिजीवी कार्यकर्त्यांची संवाद बैठक कुसुम सभागृहात उत्साहात पार पडली. या बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडत भाजप नेतृत्वाने विकास, सुरक्षा आणि सुशासन हा ठाम राजकीय संदेश दिला.
बैठकीला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, भाजप संघटन मंत्री संजय कौडगे, माजी मंत्री डी. पी. सावंत, महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष संतुक हंबर्डे, अड. किशोर देशमुख, संयोजक डॉ. अंकुश देवसरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या भाषणात अशोकराव चव्हाण यांनी नांदेडच्या विकासाची ओनरशीप स्वतः स्वीकारल्याचे स्पष्ट करत, लोकसहभाग व शासनाच्या समन्वयातून नांदेडला अधिक विकसित करू, असा निर्धार व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या विकासाच्या आश्वासनांचा उल्लेख करत भाजपचा जाहीरनामा ही केवळ घोषणा नसून कमिटमेंट असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. इंदौरच्या स्वच्छतेच्या मॉडेलपासून ते डीपी प्लॅन, रस्ता रुंदीकरण, मॉल्समुळे निर्माण झालेल्या रोजगारापर्यंत त्यांनी आपल्या कार्यकाळातील विकासकामांचा आढावा घेतला. गुंडगिरी, माफियागिरी व खंडणीखोरीवर कठोर कारवाईचा इशारा देत गुंडांना पाठिशी घालणार्या शक्तींना या निवडणुकीत हद्दपार करा आणि महापालिकेत भाजपचा महापौर बसवा, असे आवाहन त्यांनी केले. एमआयडीसी विस्तारीकरण, कनेक्टिव्हिटी, ऑनलाईन नागरी सेवा, न्यायालयीन इमारती, कॅन्सर हॉस्पिटल आणि 100 एकर विकास जमीन या मुद्द्यांतून त्यांनी भविष्यातील विकसित नांदेडची स्पष्ट झलक दाखवली. खा. डॉ. अजित गोपछडे यांनी शहरातील गुंड प्रवृत्ती, ओपन स्पेस बळकावणारे घटक आणि व्यापार्यांवरील अन्याय यावर थेट प्रहार केला. महापालिका भाजपच्या ताब्यात येताच सीसीटीव्ही नेटवर्क, पासपोर्ट सुविधा, धूळ-प्रदूषण-नशामुक्त नांदेड, होली सिटी संकल्पना आणि गोदावरी घाटाचे सुशोभीकरण राबवण्याचा निर्धार त्यांनी जाहीर केला. संयोजक डॉ. अंकुश देवसरकर यांनी भाजप नेतृत्वाची कार्यक्षम प्रतिमा अधोरेखित करत विरोधकांवर टीका केली आणि शहराच्या विकासासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन केले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही आपल्या भाषणांतून भाजपच्या विकासाभिमुख राजकारणाला पाठिंबा दर्शविला. या कार्यक्रमात हर्षद शहा, डॉ. मनीष देशपांडे, डॉ. संजय कदम, दीपक कोठारी, जयप्रकाश भराडिया, अँड. आशीष गोदमगावकर, राजेंद्र हुरणे, रवी कडगे, डॉ. बंग यांनी आपले विचार व्यक्त केले. एकूणच या संवाद बैठकीतून नांदेडसाठी भाजपचा विकास, सुरक्षा आणि सुशासनाचा अजेंडा प्रभावीपणे जनतेसमोर आला.

COMMENTS