Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छ.संभाजीनगर महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर

छ. संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे समीर राजूरकर यांनी निर्णायक विजय मिळवला. त्यांनी एमआयएमच

राज्यातील 29 महानगरपालिकांतील महापौर पदाच्या आरक्षणाची गुरुवारी सोडत
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार
शिंदेंचे नगरसेवक ठाकरे गटाच्या संपर्कात !

छ. संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे समीर राजूरकर यांनी निर्णायक विजय मिळवला. त्यांनी एमआयएमचे उमेदवार अशोक हिवराळे यांचा पराभव करत 70 मते मिळवली, तर हिवराळे यांना 33 मते मिळाली. या निकालामुळे शहराच्या प्रथम नागरिकपदी भाजपचा प्रतिनिधी विराजमान झाला असून महायुतीने महापालिकेतील आपले संख्याबळ अधोरेखित केले आहे.
प्रबोधनकार ठाकरे सभागृहात मंगळवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. मतदानाची प्रक्रिया ‘हात वर करून’ या पद्धतीने झाली. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाची भूमिका स्पष्टपणे समोर आली. निवडणुकीपूर्वीच महायुतीचे पारडे जड मानले जात होते आणि निकालाने त्यास दुजोरा दिला. दरम्यान, महापौरपदाच्या निवडीनंतर उपमहापौरपदासाठीही निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपचे राजेंद्र जंजाळ यांना 70 मते मिळाली, तर एमआयएमचे उमेदवार मोहमद वसीम अहमद यांना 33 मते मिळाली. उपमहापौरपदासाठी जंजाळ यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते, तर एमआयएमकडून एक अर्ज सादर करण्यात आला होता. छाननीनंतर सर्व अर्ज वैध ठरले. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी तटस्थ भूमिका घेतली. काँग्रेसच्या नगरसेविका मात्र महापौर आणि उपमहापौर या दोन्ही निवडणुकांच्या वेळी अनुपस्थित होत्या. शरद पवार गटाचे एकमेव नगरसेवक ओबेरॉय यांनी सभागृहात उपस्थित राहूनही मतदान न करण्याचा निर्णय घेतला. निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना नवनिर्वाचित महापौर समीर राजूरकर म्हणाले, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा कारभार संविधानाच्या मूल्यांनुसार आणि लोकशाहीच्या चौकटीत राहून चालवला जाईल. त्यांनी सभागृहात संविधान उंचावत आपली भूमिका स्पष्ट केली. महापालिकेतील या निवडणुकीमुळे शहराच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून आगामी काळात प्रशासन आणि विकासकामांबाबत महायुतीकडून कोणती दिशा दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS