नवी दिल्ली ः चित्रपट जगताचा सर्वात भव्य उत्सव असलेल्या कान 77 व्या कान चित्रपट महोत्सवाला दोन दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. दहा दिवस

नवी दिल्ली ः चित्रपट जगताचा सर्वात भव्य उत्सव असलेल्या कान 77 व्या कान चित्रपट महोत्सवाला दोन दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. दहा दिवस चालणार्या या चित्रपट महोत्सवात चित्रपटप्रेमींना आशय आणि ग्लॅमरचा मेळा अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपट महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फ्रेंच रिव्हिएरा इथे काल संध्याकाळी पहिल्यांदाच भारतीय चित्रपटांसह भारताची समृद्ध संस्कृती, खाद्यसंस्कृती आणि हस्तकला साजरी करण्यासाठी भारत पर्व महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू या पहिल्यावहिल्या भारत पर्व महोत्सवात सहभागी झाले होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ अर्थात एनएफडीसीने फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अर्थात फिक्कीच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सहभागी झालेले कानचे प्रतिनिधी, कार्यक्रमादरम्यान विविध कलाकारांनी केलेले अप्रतिम सादरीकरण आणि दोन्ही देशांच्या खाद्यसंस्कृतीच्या मिलाफामुळे अगदी तल्लीन झाले होते. हेच या कार्यक्रमाच्या यशाचे प्रतीकही ठरले. या कार्यक्रमादरम्यान भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीच्या 55 व्या पर्वाचे पोस्टर्स आणि गोव्यात 55 व्या इफ्फीच्या निमित्ताने आयोजित होणार असलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद, जागतिक मनोरंजन आणि माध्यम शिखर परिषदेच्या उद्घाटनीय पर्वाच्या तारखा नोंद करून ठेवण्यासंबंधीच्या पोस्टरचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या हस्ते अनावरणही झाले. यावेळी चित्रपट निर्माते अशोक अमृतराज, रिची मेहता, गायक शान, अभिनेता राजपाल यादव, चित्रपटसृष्टीतील दिग्गज बॉबी बेदी हे मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान भारतीय आदरातिथ्यातील आपुलकीचा अनुभव देणारे पदार्थ तयार करण्यासाठी शेफ वरुण तोतलानी यांना खास भारतातून आमंत्रित केले गेले होते. या कार्यक्रमात गायिका सुनंदा शर्मा यांच्यासह, नवोदित गायिका प्रगती, अर्जुन आणि गायक शान यांचा मुलगा माही यांंनी पाय थिरकायला लावणारी पंजाबी गीते गायली. या नंतर सगळ्या गायकांनी सादर केलेल्या मा तुझे सलाम या गाण्याने कार्यक्रमाची जोषपूर्ण सांगता गेली. उपस्थितांनी या गाण्याला टाळ्यांच्या कडकडाटाची दाद दिली. भारत पर्वनिमित्त आयोजित या कार्यक्रमासाठी अनेक प्रतिथयश मान्यवर पाहुणे उपस्थित होते. त्यामुळे हा कार्यक्रम आकर्षक तर ठरलाच, मात्र त्यासोबतच एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणूनही अधोरेखित झाला. अभिनेत्री शोभिता धुलिपाला, आसामी चित्रपटसृष्टीत आपल्या प्रभावी अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली आसामी अभिनेत्री एमी बारुआ, चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा हे मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित होते. या सगळ्यांच्या सहभागामुळे भारतीय चित्रपटसृष्टीची समृद्ध परंपरा आणि जागतिक पटलावर त्याचा वाढत असलेला प्रभावही ठळकपणे अधोरेखित झाला. चित्रपट, संस्कृती आणि कलात्मक सहयोगाच्या सादरीकरणाचा हा एक संस्मरणीय सोहळा होता, ज्याला जागतिक पटलावरील भारताच्या वाढत्या सॉफ्ट पॉवरच्या दर्शनाचीही जोड लाभली होती.
COMMENTS