खात्यात जमा झाले 1500 रुपये, अपेक्षांवर मात्र विरजणमुंबई ः राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी वर्षाच्या अखेरीस काह

खात्यात जमा झाले 1500 रुपये, अपेक्षांवर मात्र विरजण
मुंबई ः राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी वर्षाच्या अखेरीस काहीसा दिलासा देणारी, पण त्याचवेळी संभ्रम वाढवणारी परिस्थिती समोर आली आहे. बुधवारी सायंकाळपासून तर गुरूवारी सकाळी अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला असून 1500 रुपयांची रक्कम जमा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, सलग दोन ते तीन महिन्यांचे हप्ते एकत्र मिळतील, या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे.
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे हप्ते प्रलंबित असल्याने वर्षाअखेरीस किमान 3 हजार रुपये मिळतील, अशी लाभार्थी महिलांमध्ये आशा होती. काही ठिकाणी तर जानेवारी महिन्याचाही हप्ता एकत्र दिला जाईल आणि 4500 रुपये खात्यात जमा होतील, अशी चर्चा रंगली होती. प्रत्यक्षात मात्र केवळ नोव्हेंबर महिन्याचाच एक हप्ता मिळाल्याने अनेक महिलांमध्ये नाराजीची भावना दिसून येत आहे. महागाईचा भार वाढलेला असताना, सण-उत्सव आणि घरगुती खर्च डोईजड होत असलेल्या काळात अपेक्षेपेक्षा कमी रक्कम हाती पडल्याने लाभार्थी महिलांची कोंडी झाली आहे. डिसेंबर महिना संपत असतानाही त्याचा हप्ता अद्याप मिळालेला नसल्याने उर्वरित रकमेबाबत सरकारकडून स्पष्ट भूमिका कधी जाहीर होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तरीही, किमान नोव्हेंबरचा हप्ता मिळाल्याने काही महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, या योजनेतील ई-केवायसीचा मुद्दा अधिकच गंभीर ठरत आहे. ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर होती. मुदतीत ही प्रक्रिया न करणार्या महिलांचा योजनेतील लाभ बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे किंवा ई-केवायसी अपूर्ण असणे, या कारणांमुळे अनेक महिला ‘अपात्र’ ठरण्याची भीती व्यक्त करत आहेत. नवीन वर्ष 2026 पासून अशा लाभार्थींना दरमहा मिळणारे 1500 रुपये थांबू शकतात, अशी चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर, अनेक महिलांना खात्यात पैसे जमा झाल्याचा संदेश अद्याप प्राप्त न झाल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. मात्र, बँकिंग तांत्रिक अडचणी, सर्व्हरवरील ताण किंवा नेटवर्क समस्यांमुळे एसएमएस उशिरा येणे अथवा न येणे, हे सामान्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे केवळ संदेश न आल्यामुळे घाबरून न जाता पासबुक अपडेट करणे, मोबाईल बँकिंग, यूपीआय अॅप किंवा एटीएम मिनी स्टेटमेंटच्या माध्यमातून खात्याची खातरजमा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्यांबाबत अस्पष्टता
एकूणच, वर्षाच्या अखेरीस नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाल्याने काहीसा दिलासा मिळाला असला, तरी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांच्या हप्त्यांबाबत अनिश्चितता कायम आहे. ई-केवायसी न केलेल्या महिलांचे पुढे काय होणार, तसेच प्रलंबित हप्त्यांबाबत सरकार कोणता निर्णय घेणार, याकडे आता राज्यभरातील लाखो लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. शासनाकडून स्पष्ट घोषणा झाल्याशिवाय हा संभ्रम दूर होणार नाही, हे मात्र निश्चित.

COMMENTS