सांगली/मुंबई/प्रतिनिधी ः जात नाही ती, जात अशी व्याख्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी यापूर्वीच केली आहे. मात्र ही जात अजूनही पाठ सोडायला तयार नसल्य

सांगली/मुंबई/प्रतिनिधी ः जात नाही ती, जात अशी व्याख्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी यापूर्वीच केली आहे. मात्र ही जात अजूनही पाठ सोडायला तयार नसल्याचे चित्र पुरोगामी महाराष्ट्रात दिसून येत आहे. सांगलीत रासायनिक खत खरेदी करताना शेतकर्यांना त्यांची जात विचारली जात आहे. यामुळे शेतकरी आणि विक्रेत्यांच्या मध्ये वाद सुरू झाला आहे.
रासायनिक खतांसाठी शासन कंपनीला अनुदान देते. अनुदान देण्यासाठी तीन-चार वर्षांपासून ई-पॉस मशिन यंत्रणा आहे. रसायनिक खत खरेदी करताना शेतकर्यांना त्यांचा आधारकार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि पोत्यांची संख्या सांगितल्यानंतर पॉस मशिनवर अंगठा देऊन खत मिळायचे. मात्र, सांगलीत गेल्या तीन-चार दिवसांपासून रसायनिक खत खरेदी करताना शेतकर्यांना थेट त्यांची जात विचारली जात आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजा हवादील झाला आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. मात्र, या संकटांना पायदळी तुडवून नव्या जोमाने उभ्या राहणार्या बळीराजाला आता वेगळ्याच गोष्टींना तोंड द्यावे लागत आहे. रसायनिक खत खरेदी करताना जात विचारली जात असल्यामुळे शेतकरी आणि विक्रेत्यांमध्ये वाद सुरु झाले आहेत. केंद्र सरकारच्या खत मंत्रालयाामार्फत पॉस मशिन ही यंत्रणा चालविली जाते. या मशीनमध्ये काही दिवसांपूर्वी नवीन अपडेट्स आले आहेत. ज्यात शेतकर्यांना इतर माहितीसह जातही सांगावी लागत आहे. यासंदर्भात एका कृषी अधिकार्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. नव्या सॉप्टवेअरमध्ये जातीची माहिती कशासाठी घेतली जात आहे? याबाबत सविस्तर माहिती मिळताच शेतकर्यांना कळवण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अहो शेतकरी हीच आमची जात आहे, खते खरेदी करताना शेतकर्यांना जात कसली विचारताय, असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला सभागृहात विचारला आहे. सांगली येथे रासायनिक खते खरेदी करताना जात विचारली जात असल्याचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला व जातीवाद निर्माण करणार्या सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले. रासायनिक खते खरेदी करताना शेतकर्यांना जात का सांगावी लागत आहे. ती का नोंदवावी लागते आहे असा सवालही अजित पवार यांनी केला आहे.
सरकार वर्णभेदासाठी आग्रही का ः जयंत पाटील
शेतकर्यांना खतासाठी जात विचारणे ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असून याचा निषेध माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला. सांगली येथील खते खरेदी करताना शेतकर्यांना जात विचारली जात असल्याचा मुद्दा जयंत पाटील यांनी उपस्थित करुन शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकार वर्णभेदासाठी किती आग्रही आहे हे सरकारच्या या भूमिकेतून दिसत आहे. सरकारने ही भूमिका रद्द केली पाहिजे. ही बाब जातीभेद वाढवणारी ठरू शकते, अशी भीतीही जयंत पाटील यांनी व्यक्त केली
COMMENTS