Homeताज्या बातम्यादेश

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभावाला फलंदाज जबाबदार ः गिल

इंदूर : इंदूर येथे झालेल्या तिसर्‍या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून 41 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारताने त

दुबळ्या अफगाणिस्तानवर टिम इंडिया बरसली ; रागावलेल्या भारतीयांना दिवाळ भेट दिली !
महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघात नगर जिल्ह्यातील खेळाडूंनी आपल्या खेळाचा दबदबा कायम राखला -आ.अरुणकाका जगताप
सुधन प्रीमियर लीगमध्ये ‘लोकमंगल’ विजयी  

इंदूर : इंदूर येथे झालेल्या तिसर्‍या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून 41 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारताने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 1-2 अशी गमावली. विशेष म्हणजे, न्यूझीलंडने पहिल्यांदाच भारतात एकदिवसीय मालिका जिंकण्याचा मान मिळवला.
मालिकेतील या अपयशानंतर भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने पराभवाची मुख्य जबाबदारी फलंदाजांवर टाकली. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलताना गिल म्हणाला की, गेल्या काही दिवसांत संघ सर्वच विभागांमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही, मात्र फलंदाजीतील अपयश अधिक ठळकपणे जाणवले. गिलने स्पष्ट केले की, संघाला अनेक सामन्यांत चांगली सुरुवात मिळाली, मात्र त्या सुरुवाती मोठ्या धावसंख्येत रूपांतरित करण्यात फलंदाज अपयशी ठरले. विशेषतः अव्वल फळीतील फलंदाजांनी दीर्घ खेळी न केल्याने संघावर दबाव वाढला. भारतासारख्या संघाला मोठी धावसंख्या उभारायची असेल, तर सुरुवातीचा फायदा टिकवणे अत्यंत महत्त्वाचे असते, असे गिलने नमूद केले. गोलंदाजीबाबत बोलताना त्याने मधल्या षटकांत विकेट्स न मिळाल्याची कबुली दिली. कुलदीप यादवला अपेक्षित यश न मिळाल्याबद्दल गिल म्हणाला की, गेल्या काही वर्षांतील त्याची कामगिरी पाहता तो संघाचा महत्त्वाचा स्ट्राइक गोलंदाज आहे. या मालिकेत त्याला विकेट्स मिळाल्या नसल्या, तरी अशा अनुभवांतूनच संघाला सुधारण्याची संधी मिळते, असेही त्याने सांगितले. कर्णधाराने फिल्डिंगमधील कमतरताही खुलेपणाने मान्य केली. मालिकेत काही महत्त्वाचे झेल सोडले गेले आणि त्यामुळे सामन्यांचा प्रवाह भारताच्या हातून निसटला. दोन्ही संघांतील हा मोठा फरक ठरला. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी मिळालेल्या संधींचा पुरेपूर फायदा घेतला आणि त्यांची फिल्डिंगही आमच्यापेक्षा सरस ठरली, असे गिल म्हणाला.
दरम्यान, गिलने विराट कोहलीच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले. कोहलीची फलंदाजी संघासाठी नेहमीच मोठी ताकद ठरते, असे सांगत त्याने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करणार्‍या हर्षितच्या जबाबदार खेळीचाही उल्लेख केला. तसेच, मालिकेत भारतीय वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्याचेही त्याने स्पष्ट केले. रोहित शर्माच्या अपयशाबाबत विचारले असता, गिलने त्याचे समर्थन केले. रोहितला या मालिकेत मोठी धावसंख्या करता आली नसली, तरी त्यामुळे त्याच्या क्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उभे करता येणार नाही, असे तो म्हणाला. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अलीकडील मालिकांतील रोहितची कामगिरी त्याच्या गुणवत्तेची साक्ष देणारी आहे. प्रत्येक वेळी सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर होईलच असे नाही, असे मतही गिलने व्यक्त केले.

COMMENTS