अहमदनगर/प्रतिनिधी : शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारात तीस वर्षीय तरुणाने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी दिनांक 18 रो
अहमदनगर/प्रतिनिधी : शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारात तीस वर्षीय तरुणाने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी दिनांक 18 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की, महिला पोलिस नाईक वंदना काळे या शनिवारी (दिनांक 18) रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पोलिस ठाणे अंमलदार म्हणून काम करीत असताना सकाळी 10.30 वा सुमारास संतोष गर्जे यांनी कोतवाली पोलिस ठाण्याच्या फोनवर फोन करून सांगितले की, नंदनवन हॉटेलसमोर शिवीगाळ व मारहाण चालू आहे. त्या ठिकाणी पोलिस पाठवा असे कळविल्याने त्या ठिकाणी सेक्टर नं. 2 चे अंमलदार पोलिस कॉन्स्टेबल नवले व वाघेला असे तात्काळ त्यांनी रवाना केले. त्यानंतर थोड्या वेळाने एक तरुण पोलिस ठाण्यात आला व त्याने त्याचे नाव अमित कारभारी आंधळे (रा.नेप्तीनाका, अहमदनगर ) असे असल्याचे सांगितले.
बायकोच्या व तिच्या भावाच्याविरोधात मला तक्रार द्यायची आहे, असे तो म्हणाला म्हणून त्याच्याकडे सविस्तर विचारपूस करीत असताना थोड्याच वेळात आणखी एकजण पोलिस ठाण्यात आला व त्याने त्याचे नाव राम विष्णु डमाळे (रा. बारादरी, ता. जि. अहमदनगर) असे असल्याचे सांगितले. तसेच थोड्या वेळापूर्वी नंदनवन लॉनसमोर बहिणीचा पती अमित आंधळे हा शिवीगाळ व मारहाण करीत असल्याने मी 112 नंबरला कॉल करून पोलिस मदत मागितली होती तसेच आमचे नातेवाईक पोलिस संतोष गर्जे यांनीदेखील त्यांच्या मोबाईलवरून कोतवाली पोलिस स्टेशनला फोन करून पोलिस मदत मागितली होती असे आम्हाला सांगितले. त्यानंतर झालेल्या प्रकाराबाबत त्यांच्याकडे सविस्तर विचारपूस करून कोतवाली ठाण्यात भा.द.वी. कलम 323, 504, 506 प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करीत असताना पोलिस ठाण्यात आलेला आणि या एनसी मधील आरोपी अमित कारभारी आंधळे हा पोलीस स्टेशनच्या बाहेर निघून गेला. त्यानंतर थोड्यावेळाने 12.40 वाजण्याच्या सुमारास एक महिला ठाणे अंमलदार कक्षात आली व तिच्या हातातील थोडे औषध शिल्लक असलेली रिकामी विषारी औषधाची बाटली ठाणे अंमलदार काळे यांना दाखवून म्हणाली की, या बाटलीतील औषध माझा मेव्हण्याने प्यायले असून ही बाटली आम्हा नातेवाईकांसमोर फेकून बाटलीतील औषध मी पिलो आहे, करा आता काय तक्रार करायची ते, असे आम्हाला म्हणून तो पोलिस स्टेशनच्या आवारात पडलेला आहे, असे ती म्हणाल्याने काळे यांनी त्या बाटलीवरील नाव पाहून त्या तात्काळ गेटच्या दिशेने गेल्या तेव्हा पोलिस स्टेशनच्या आवारात अमित आंधळे हा उताण्या अवस्थेत निपचित पडलेला दिसला. त्यानंतर पोलिसांनी रिक्षा बोलावून विषारी औषध पिलेला अमित आंधळे याला त्याच्या नातेवाईकासह औषधोपचारासाठी सिव्हील हॉस्पीटलला पाठवले. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी पोलिस नाईक वंदना काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमित आंधळे याच्याविरुध्द भा.द.वी. कलम 309 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या गुन्हयाचा तपास पोलिस उपनिरीक्षक इंगळे करीत आहेत.
COMMENTS