शेवगाव : तालुक्यातील नागलवाडी येथे शुक्रवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी धाडसी हल्ला करत सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात भीषण दरोडा टाकल्याची धक

शेवगाव : तालुक्यातील नागलवाडी येथे शुक्रवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी धाडसी हल्ला करत सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात भीषण दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली. दरोडेखोरांनी चाकू व तलवारीचा धाक दाखवत घरातील कपाटे फोडून सुमारे 70 ते 75 लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डोंगराळ भाग व मराठवाड्याच्या सरहद्दीवर भगवानगडच्या पायथ्याशी असलेल्या नागलवाडी गावातील सेवानिवृत्त शिक्षक राम मारुती गीते (वय 65) हे पत्नी छाया गीते यांच्यासह शुक्रवारी रात्री घरी झोपलेले असताना मध्यरात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी घराचा दरवाजा तोडून बंगल्यात प्रवेश केला. त्यानंतर दरोडेखोरांनी दोघांना धारदार शस्त्रांचा धाक दाखवत घरातील कपाटांची उचकापाचक केली. दरोडेखोरांनी घरातील या दरोड्यात सुमारे 55 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच 1 लाख रुपये रोख रक्कम असा एकूण अंदाजे 70 ते 75 लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच रात्री स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहचले मात्र शनिवारी सकाळी पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे,पोलिस उपअधीक्षक नीरज राजगुरू यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. धक्कादायक घटनेमुळे नागलवाडी, गोळेगाव व कोनोशी परिसरात नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे.
मागील दरोड्याचाच तपास लागेना
दोन महिन्यांपूर्वी बोधेगाव परिसरातील खिळे वस्तीवर मकरसंक्रांतीच्या मध्यरात्री वैद्य नामक
पोलिस कर्मचार्याच्या कुटुंबीयांवर मारहाण करून दरोड्याची घटना घडली होती. मात्र त्या घटनेचा अद्याप तपास लागलेला नसल्याने शेवगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
बोधेगाव स्वतंत्र पोलीस ठाणे निर्मितीचा प्रश्न कायम
मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या बोधेगाव परिसरातील वाढती गुन्हेगारी, वाढलेली लोकसंख्या आणि विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता येथे स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हा प्रश्न आजतागायत प्रलंबितच राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या या महत्त्वाच्या भागात वाढती लोकसंख्या, व्यापारी व्यवहार आणि वाहतूक लक्षात घेता बोधेगाव येथे स्वतंत्र पोलीस ठाणे तातडीने सुरू करावे, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा बाळासाहेब ढाकणे यांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS