Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सेवाभावामुळे आनंदऋषीजी हॉस्पिटलचा नावलौकिक

मंगला रूणवाल ः मेंदूविकार तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद

अहमदनगर: राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या आशीर्वादाने जैन सोशल फेडरेशन आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून मानवसेवेचे महान कार्य करीत आहे

महापालिकेत पसरला आनंदोत्सव…132 जणांना पदोन्नती
राहुरी फॅक्टरीत महावितरण अधिकार्‍यास मारहाण
बोकड कापण्याच्या सुर्‍याने तरुणावर जीवघेणा हल्ला

अहमदनगर: राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या आशीर्वादाने जैन सोशल फेडरेशन आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून मानवसेवेचे महान कार्य करीत आहे. अत्याधुनिक उपचार सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित स्टाफ असल्याने रूग्णालयाचा केवळ राज्यात नाही तर देशभरात नावलौकिक झालेला आहे. या सेवाभावी कार्यात योगदान देताना नेहमीच आनंद होतो. सूक्ष्म व्यायामाव्दारे मोफत मणके विकार उपचार विभागाचाही हजारो रूग्णांना लाभ होत आहे. याचा रूणवाल परिवाराला विशेष आनंद आहे. हॉस्पिटलमधील नवनवीन प्रकल्प रूग्णांना नवीन जीवन देणारे ठरत आहेत. या कार्यास कायम हातभार लावण्याचा प्रयत्न राहिल. आज रक्षाबंधनाचा सण असून भावा बहिणीच्या अतूट नात्याप्रमाणेच हॉस्पिटल व रूग्णांचेही मायेचे, आपुलकीचे नाते आहे, असे प्रतिपादन पुणे बिजापूर येथील सौ.मंगला सतिष रूणवाल यांनी केले.
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म.सा.यांच्या 124 व्या जन्मजयंतीनिमित्त जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे मेंदूविकार व मेंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. स्व.श्रीमती पानाबाई लक्ष्मीचंदजी रूणवाल व स्व.सुनिलजी लक्ष्मीचंदजी रूणवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रूणवाल परिवार, बीजापूर, पुणे यांनी या शिबिरासाठी सहकार्य केले. शिबिराचे उद्घाटन मंगला सतिष रूणवाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी श्री बडीसाजन ओसवाल श्री संघाचे अध्यक्ष पेमराज बोथरा, उद्योजक संतोष बोथरा, सतिश बोथरा, रोहन बोथरा, जैन सोशल फेडरेशनचे सी.ए.आयपी अजय मुथा, सतीश लोढा, सुभाष मुनोत, प्रकाश छल्लाणी, डॉ.आशिष भंडारी, मेंदूविकार तज्ज्ञ डॉ.गौतम काळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात सी.ए.आयपी अजय मुथा म्हणाले, आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या आतापर्यंतच्या यशस्वी वाटचालीत बोथरा व रूणवाल परिवाराचा सिंहाचा वाटा आहे. बोथरा परिवार तर तनमनधनाने या सेवाकार्यात सुरुवातीपासून सहभागी आहे. हॉस्पिटलच्या प्रत्येक नवीन प्रकल्पात त्यांचे योगदान असते. रूणवाल परिवाराच्या सहकार्याने हॉस्पिटल अंतर्गत मागील 6 वर्षांपासून डॉ.प्रसाद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र सूक्ष्म व्यायाम पध्दतीने मोफत मणके विकार उपचार विभाग कार्यरत आहे. याठिकाणी रूग्णांवर सूक्ष्म व्यायाम पध्दतीने मणके, मानदुखी, गुडघेदुखी अशा आजारांवर उपचार केले जातात. 3 हजारांहून अधिक रूग्णांना याचा लाभ झाला असून महाराष्ट्राबाहेरुनही रूग्ण याठिकाणी येतात. डॉ.गौतम काळे म्हणाले, विविध कारणांमुळे नसा कमजोर झाल्यावर अनेक समस्या निर्माण होतात. या शिबिरात डोके दुखी, अपस्मार, पक्षाघात, पॅरालिसीस, कंबरदुखी, नसांचे विकार, स्नायुंचे विकार, मेंदूतील जंतुसंसर्ग, मेंदूज्वर, स्मृतीभ्रंश तसेच मेंदू, मणके, मज्जारज्जू संबंधित आजार तपासणी, ट्रॉमा सर्जरी, मेंदूतील रक्तस्त्राव, स्लीपडिक्स, मणक्यातील चकती सरकणे, झटके येणे आदींवर उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातील. ईईजी, ईएमजी तपासण्या 50 टक्के सवलतीच्या दरात करण्यात आल्या. या शिबिरात 105 रूग्णांची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आशिष भंडारी यांनी केले तर आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.

COMMENTS