अहिल्यानगर :अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अहिल्यानगर जिल्हा शाखेची सन २०२४–२५ या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर रोजी
अहिल्यानगर :अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अहिल्यानगर जिल्हा शाखेची सन २०२४–२५ या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर रोजी माऊली सभागृह येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेत शाखेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यामध्ये रंगकर्मी अमोल खोले यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून रविंद्र काळे उपाध्यक्ष, सतीश लोटके कार्याध्यक्ष, सागर मेहेत्रे प्रमुख कार्यवाह, रियाज पठाण सहकार्यवाह, अनंत जोशी कोषाध्यक्ष, शशिकांत नजन संघटक तर गणेश लिमकर व तुषार चोरडिया यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
या सभेसाठी निरीक्षक म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबईचे उपाध्यक्ष नरेश गडेकर तसेच नियामक मंडळाचे सदस्य उज्ज्वल देशमुख उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सभेतील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सभेच्या प्रारंभी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचन करण्यात आले. तसेच शाखेच्या कार्याचा वार्षिक अहवाल व आर्थिक वर्षाचा हिशोब सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यासोबतच १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीसाठीचे अंदाजपत्रकही संमत करण्यात आले.
याशिवाय सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी होणाऱ्या शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकांबाबत चर्चा करून आवश्यक निर्णय घेण्यात आले. शाखेच्या भावी कार्याबाबत सदस्यांनी आपले विचार मांडले. स्वस्त नाटक योजना, राज्यस्तरीय व आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा, नाट्य प्रशिक्षण शिबिरे तसेच कलावंतांसाठी नव्या उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली.
अहिल्यानगर जिल्हा शाखेचे रौप्य महोत्सवी वर्ष उत्साहात साजरे करण्यात येणार असून, त्या निमित्ताने विविध सांस्कृतिक व नाट्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी मराठी रंगभूमीच्या विकासासाठी, नवोदित कलावंतांना अधिकाधिक संधी देण्यासाठी आणि नाट्यचळवळ अधिक व्यापक करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. सभेच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त करत नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन केले.

COMMENTS