अकोले प्रतिनिधी : सिंधुताई सपकाळ अकोल्याच्या नव्हत्या, त्यांचे इथे कुणी नातेवाईकही नाहीत परंतु आपल्या घरातले कोणीतरी गेले आहे अशा भावनेने अकोल्यातील
अकोले प्रतिनिधी : सिंधुताई सपकाळ अकोल्याच्या नव्हत्या, त्यांचे इथे कुणी नातेवाईकही नाहीत परंतु आपल्या घरातले कोणीतरी गेले आहे अशा भावनेने अकोल्यातील अनेक नागरिकांनी एकत्र येऊन त्यांच्या आठवणी जागवल्या. करुणेचे नाते अधिक खोलवर रुजलेले असते, याचा श्रद्धांजली सभेने प्रत्यय दिला. सिंधुताई अकोल्यात अनेकदा यायच्या त्यातून त्यांचा एक परिवार तयार झाला.
ललित छल्लारे,प्रशांत धुमाळ , अमोल वैद्य व घनश्याम माने या त्यांच्या परिवारातील सदस्यांनी पुढाकार घेऊन अकोल्यातील हुतात्मा स्मारकात सिंधुताईंच्या सर्व चाहत्यांना एकत्र करून त्यांच्या आठवणी जागवल्या. शोकाकुल वातावरणात सिंधुताईंच्या स्वभावातील अनेक पैलू पुढे आले. त्यांचे आयुष्यभर अनवाणी चालणे, प्रत्येकाची मायेने चौकशी करणे , अकोल्यातुन झालेली आर्थिक मदत तसेच कांदे व कपडे गोळा करून त्यांना पाठवणे , वेगवेगळ्या कार्यक्रमात अकोल्यात त्या आल्या होत्या तेंव्हा च्या त्यांच्या आठवणी या कार्यक्रमात अनेकांनी जागवल्या . घनश्याम माने यांनी सिंधुताईंच्या उपस्थितीत केलेले मानपत्र पुन्हा एकदा ऐकवले…ललित छल्लारे यांनी अकोल्यात सिंधुताई जेव्हा जेव्हा आल्या , त्या सर्व घटना व त्यांच्याशी निर्माण झालेले नाते सांगत अनेक वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला तर प्रशांत धुमाळ यांनी सिंधुताई सोबत केलेल्या प्रवासांचे व त्यांच्यामुळे सामाजिक कार्याची आवड कशी लागली आहे सांगितले.अमोल वैद्य यांनी अकोले व सिंधुताई यांचे नाते कसे वेगळे होते हे विशद केले. अर्थवेद पतसंस्थेचे चेअरमन बी. एम. महाले यांनी सिंधुताईच्या स्मृती प्रत्यक्ष कार्यातून जागवण्यासाठी अकोल्यात स्थायी उपक्रम व्हावा असे सुचवले तर शांताराम गजे यांनी त्यांच्या हृदयातील करुणेमुळेच आपण त्यांच्याशी जोडले गेलो आहोत असे सांगितले.हेरंब कुलकर्णी यांनी मदर तेरेसा, बाबा आमटे आणि साने गुरुजी यांच्या प्रेरणेशी सिंधुताई जोडलेल्या आहेत असे मत व्यक्त केले. बी. के. बनकर सर यांनी एका शाळेच्या पालक सभेला त्या कश्या आल्या याची वेगळी आठवण सांगितली. शरद चौधरी , अण्णासाहेब ढगे , डॉ. रविंद्र गोर्डे व भास्कर तळेकर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. सिंधुताईंच्या आठवणीने सारे जण भाऊक झाले. सिंधुताईंच्या नावाने अकोल्यात वंचितांसाठी कायमस्वरूपी मदत करणारा निधी उभारावा या सूचनेवर सर्वांनी सहमती दर्शवली. सुभाष चासकर , राजेंद्र भाग्यवंत, भाऊसाहेब कासार , दीपक पाचपुते,सुनील शेळके,नारायण छल्लारे, दत्तात्रय आवारी, प्रभाकर जगताप आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. सिंधुताईंना श्रद्धांजली अर्पण करून सभेची सांगता झाली.
COMMENTS