अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राचे दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याविषयी केलेल्या विधानावर आता सर्वच राजकीय नेते चर्चा करू पाहताहेत. रा
अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राचे दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याविषयी केलेल्या विधानावर आता सर्वच राजकीय नेते चर्चा करू पाहताहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावर प्रत्यक्ष प्रतिक्रिया दिली नसली तरी एका मुलाखतीत त्यांनी सिंचन घोटाळ्यावर मी श्वेत पत्रिका काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर अजित पवारांनी माझे सरकार कोणतेही कारण नसताना पाडल्याची प्रतिक्रिया देत, तिथेच त्यांची भाजपसोबत जाण्याची बीजे दडलेली असल्याचे म्हटले. तर, खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अजितदादा पवार यांना सिंचन घोटाळा चौकशी करण्याच्या फाईलवर आर.आर. पाटील यांची सही असल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी अजितदादांना फाईल दाखवलीच कशी? राज्याचा एक मुख्यमंत्री गोपनीय फाईल दाखवू कसा शकतो, हा त्यांचा मुळ प्रश्न आहे. एकंदरीत, दिवंगत आर. आर. पाटील यांनी केवळ राजकीयच नव्हे तर, सामाजिक स्वरूपाचेही अनेक उपद्रव करून ठेवले आहेत. महाराष्ट्राचे इतिहास तज्ज्ञ तथा युवा विचारवंत डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी आणि प्रविणदादा गायकवाड यांनी आपल्या अनेक वैचारिक लेखात असा दावा केला आहे की, महाराष्ट्रात आर. आर. पाटील यांनी सामाजिक अस्थैर्य निर्माण करणाऱ्या शक्तींचा उदय घडवला. ज्यात ते प्रामुख्याने मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हे आर. आर. पाटील यांच्या राजाश्रयाखाली वाढल्याचा ते आरोप करतात. दिवंगत आर. आर. आबा यांनीच आज जो अर्बन नक्षल शब्द सामाजिक चळवळींना वापरण्याचे दु:साहस केले जाते, त्याची प्रसुती गृहमंत्री असलेल्या आबांचे कृत्य होते. जगातील सर्वात क्रुर स्वरूपाचा जातीय अत्याचार ज्या गावात घडला; त्या खैरलांजी गावाला महात्मा गांधी तंटामुक्त गाव घोषित करण्याची हातचलाखी देखील आबांचीच होती. अशा चौफेर असामाजिक शब्द, संकल्पना, घटनांना जन्म देणारे आबा महान होते असा दावा कोणीही करू नये. त्यामुळे, आम्ही अजितदादा पवार यांच्या वक्तव्यावर टिकेची झोड उठवू इच्छित नाही. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर आमचे एवढेच म्हणणे आहे की, जेव्हा दोघांचे भांडण सुरू होते, तेव्हा, सत्य बाहेर यायला लागते. आजपासून पंधरा वर्षांपूर्वी चे सत्य बाहेर येत असेल तर त्यात लोकांना सत्य कळण्याचा फायदा होतोय. असो. राजकारण आणि युद्ध या दोन बाबींमध्ये सारे काही क्षम्य असतं, असे म्हटले जात असले तरी, त्यात पुरेशी सत्यता नाही; युध्दात जेव्हा सामान्य नागरिकांच्या वसाहतींना निशाना केला जातो, ते युध्दात क्षम्य असत नाही. याचा अर्थ अपवाद असतातच. सध्याच्या विधानसभा निवडणूका युध्द सदृश्य असल्या तरी हे राजकीय युध्द आहे. या युध्दात काॅर्पोरेट चा पैसा आणि राजकारण्यांची रणनिती आहे. यात, काॅर्पोरेट भांडवलदारांची अब्जावधींची गुंतवणूक असलेल्या मुंबई ला राखायचे असल्याने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. अजितदादा पवार हे देखील या भांडवलदारांच्या रक्षणार्थ निवडणूकीच्या मैदानात उतरल्याने, कोणतीही किंमत मोजून यश संपादन करायचे त्यांचे राजकीय उद्दिष्ट म्हणून क्षम्य आहे. आर. आर. पाटील यांची प्रतिमा लार्जर दॅन लाइफ निर्माण केली गेली आहे. संभाजी भिडे यांना त्यांनी त्याकाळात दिलेला राजाश्रयाचा मोबदला व्यवस्थेने आर. आर. यांचा महिमा उभा केला होता. त्या महिमामंडनाचे खंडनच अप्रत्यक्षपणे अजितदादा पवार यांनी केले आहे. त्यामुळे, ते स्वागताचे धनी आहेत; टिकेचे नव्हे! महाराष्ट्राच्या सामाजिक शांततेला जे नख ओरबाडले गेले आहे, त्यातील पहिला ओरखडा आर. आर. यांचा होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पडदा अजितदादा यांनी टराटरा फाडला आहे. याबद्दल अजितदादांचे अभिनंदन करायला हवे. कारण, प्रथमच त्यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी जातवर्गाचे पडद्यामागील सत्य बाहेर आणले आहे.
COMMENTS