मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत अपघात की नियोजित घातपात, असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेवर आता

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत अपघात की नियोजित घातपात, असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर आणि अस्वस्थ करणारे प्रश्न उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, अजित पवार यांचा मूळ प्रवास कारने करण्याचा होता. मात्र आदल्या रात्री अचानक काही कारणांमुळे त्यांचा वेळ मुंबईत कसा अडवून धरला गेला आणि दुसर्या दिवशी घाईगडबीत विमानप्रवासाचा निर्णय कसा झाला, याचा तपास होणे आवश्यक आहे. हे केवळ योगायोग होते की पूर्वनियोजित रणनीती? असा थेट सवाल त्यांनी केला.
विमान उड्डाणाच्या अगदी आधी दोन्ही वैमानिक बदलण्यात आले, ही बाब संशयास्पद असल्याचे रोहित पवार म्हणाले. तसेच संबंधित विमान कंपनीला विमान उड्डाणयोग्य असल्याचे प्रमाणपत्र कोणी दिले, त्याचा तपशील आणि अहवाल अद्याप सार्वजनिक का करण्यात आला नाही, यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अपघाताच्या वेळी वैमानिकाकडून कोणताही ‘मदत संदेश’ (मेडे कॉल) देण्यात आला नाही. तसेच विमानाचे स्थान दर्शवणारे संकेतयंत्र (ट्रान्सपाँडर) बंद का होते, हा अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचे रोहित पवार यांनी नमूद केले. विमान मुद्दाम अपघाताच्या दिशेने नेण्यात आले का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. घटनेमागे कट असण्याची शक्यता मांडताना रोहित पवार यांनी इस्त्रायलच्या गुप्तचर संघटनेवर प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाचा उल्लेख केला. त्या पुस्तकात एखाद्या नेत्याला संपवायचे असल्यास थेट त्याच्यावर नव्हे, तर त्याच्या जवळच्या व्यक्ती किंवा व्यवस्थेवर प्रहार केला जातो, असा उल्लेख आहे. अजित पवार यांच्या बाबतीत असाच काही प्रकार घडला का, याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. रोहित पवार यांनी दावा केला की, पूर्व विदर्भातील एका नेत्याने अजित पवार यांच्याकडे एका महत्त्वाच्या फाईलवर तातडीने सही करण्याचा आग्रह धरला. ती फाईल घरी असल्याने मंत्रालयात ये-जा करत वेळ गेला. त्यानंतर त्यांच्याच पक्षातील एका वरिष्ठ नेत्याची भेटही विलंबाने झाली. परिणामी कारने जाण्याचा निर्णय बदलून दुसर्या दिवशी विमानप्रवास ठरवण्यात आला. हा सगळा घटनाक्रम योगायोग आहे की नियोजन? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
परदेशी तपास संस्थांची चौकशी हवी
या प्रकरणाची चौकशी केवळ देशांतर्गत यंत्रणांकडूनच नव्हे, तर फ्रान्स किंवा अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय तपास संस्थांकडूनही व्हावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. त्यामुळे तपास प्रक्रियेवर कोणताही संशय राहणार नाही, असे ते म्हणाले.
रोहित पवारांचे पाच ठोस प्रश्न
-विमान एका बाजूला झुकण्यामागे नेमका कोणता बिघाड होता?
-विमानात तांत्रिक दोष किंवा यांत्रिक अपयश झाले होते का?
-उड्डाणापूर्वी विमानाची संपूर्ण तपासणी झाली होती का? उड्डाण नोंदवही आणि उड्डाणयोग्यता अहवाल कुठे ?
-नियमित देखभाल झाली होती का? ती कोणी केली? विमान तळावरील सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे?
-विमानाची मोठी देखभाल (हेव्ही मेंटेनन्स) कधी झाली होती? त्याचा अहवाल कुठे आहे?

COMMENTS