युतीनंतर…युतीतच मिळाली 25 वर्षांनी संधी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युतीनंतर…युतीतच मिळाली 25 वर्षांनी संधी

विखे करणार यंदा पोलिस मुख्यालयात झेंडावंदन

अहमदनगर/प्रतिनिधी : तब्बल 25 वर्षांपूर्वी 1997मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना नगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केलेले ज्येष्ठ नेते

BREAKING: आता नगरमधील २६ खासगी रुग्णालयांची लूटमार थांबणार, रुग्णांना दिलासा | Lok News24
ओबीसी अध्यादेशावर सही समाजाला दिलासा देणारी घटना – ना.विजय वडेट्टीवार
अंगावर स्लॅब कोसळून कामगार गंभीर जखमी

अहमदनगर/प्रतिनिधी : तब्बल 25 वर्षांपूर्वी 1997मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना नगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केलेले ज्येष्ठ नेते व विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आता पुन्हा तब्बल 25 वर्षांनी राज्यात अवतरलेल्या शिंदेशाही (शिवसेना)-भाजप या नव्या युती सरकारमध्येच जिल्हा पोलिस मुख्यालयातील स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य झेंडावंदनाची संधी मिळाली आहे. उद्या (सोमवारी, 15 ऑगस्ट) सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी त्यांच्या हस्ते जिल्ह्याचे मुख्य ध्वजवंदन होणार आहे.
सलग सातव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातव्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आतापर्यंत स्थापन झालेल्या बहुतांश राज्य सरकारांपैकी मधले पाच वर्षांचे भाजप-शिवसेनेचे सरकार वगळता दोन्ही काँग्रेसच्या अन्य मंत्रिमंडळात ते मंत्री होतेच. पहिले 1997मध्ये युती सरकारमध्ये शिवसेनेकडून मंत्रीपद भूषवताना नगर जिल्ह्याचे ते पालकमंत्री होते. मात्र, नंतर सलग 15 वर्षे दोन्ही काँग्रेसच्या सत्तेत ते मंत्री होते. पण जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांना मिळाले नव्हते. या काळात दिलीप वळसे पाटील, बबनराव पाचपुते व जयंत पाटील पालकमंत्री होते. त्यानंतर फडणवीस यांच्या भाजप सत्तेच्या काळात प्रा. राम शिंदे व मागच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कोल्हापूरचे हसन मुश्रीफ पालकमंत्री होते. आता राज्यात शिंदेशाही (शिवसेना)-भाजप या नव्या युतीच्या सरकारमध्ये भाजपचे मंत्री म्हणून विखेंनी शपथ घेतली आहे. पण अजून खातेवाटप झाले नसल्याने व जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही निश्‍चित झाले नसले तरी अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त येथील पोलिस मुख्यालयात होणार्‍या जिल्ह्याच्या मुख्य झेंडावंदनाचा सन्मान विखेंना मिळणार आहे. 1997मध्ये युतीच्या सत्तेमध्ये शिवसेनेचे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांना झेंडावंदनाचा मान मिळाला होता. त्यानंतर तब्बल 25 वर्षांनी पुन्हा युतीच्याच सरकारमध्ये, पण भाजपचे मंत्री म्हणून त्यांना हा मान मिळणार आहे. या वर्षी अहमदनगर जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते होत आहे. यापूर्वी विखे पाटील 1917 ते 99 युती सरकारच्या काळात पालकमंत्री होते. 1995मध्ये ते पहिल्यांदा काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे 1997मध्ये त्यांचे वडील (स्व.) बाळासाहेब विखे यांनी शिवसेनेत प्रवेश करून ते शिवसेनेकडून खासदार व केंद्रात मंत्रीही झाले. त्यामुळे राधाकृष्ण विखे यांनीही काँग्रेसचा त्याग करून शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे 1997ला पोटनिवडणूक झाली व त्यात अपेक्षेप्रमाणे पुन्हा विखे आमदार झाले व लगेच त्यावेळचे शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या सरकारमध्ये ते कृषी व जलसंधारण मंत्री झाले. त्यावेळी ते जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या हस्तेच त्या काळात स्वातंत्र्य दिनाचे व प्रजासत्ताक दिनाचे झेंडावंदन झाले. मात्र, त्यानंतर त्यांना संधी मिळाली नाही. मधल्या 25 वर्षांच्या काळात अनेकवेळा मंत्री असूनही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांना मिळाले नाही. 2014च्या भाजप-शिवसेना सत्तेच्या काळात ते राज्याचे विरोधी पक्ष नेते होते. त्यामुळे मुख्य झेंडावंदनाची संधी त्यांना मिळाली नव्हती. त्यानंतर थेट आता त्यांना ही संधी मिळणार आहे. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा अलीकडेच विस्तार करण्यात आला. नव्या 18 जणांनी शपथ घेतली. त्यात पहिल्या क्रमांकाची शपथ विखेंनीच घेतली आहे. पण खातेवाटप व पालकमंत्री नियुक्त्या झालेल्या नाहीत. मात्र, स्वातंत्र्यदिनी कोणाच्या हस्ते कोणत्या जिल्ह्यात ध्वजारोहण करायचे, याची यादी सरकारने प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये अहमदनगरमध्ये विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. 25 वर्षांनी त्यांना मिळालेली ही संधी चर्चेची झाली आहे.

खाते व पालकमंत्रीपदाची प्रतीक्षा
नव्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये नगर जिल्ह्यातून सध्या केवळ विखे यांचीच वर्णी लागली आहे. मात्र, या मंत्रिमंडळात महिलांना स्थान नसल्याने राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. परिणामी, येत्या 15 दिवसातच मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित आहे. त्यात नगर जिल्ह्यातील प्रा. राम शिंदे, बबनराव पाचपुते व मोनिकाताई राजळे या तीन आमदारांपैकी कोणाची मंत्री म्हणून वर्णी लागते, हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे. मात्र, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते म्हणून विखे यांच्याकडेच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद येण्याची चिन्हे आहेत. फक्त अधिकृत घोषणेद्वारे त्यावरील शिक्कामोर्तब प्रतीक्षेत आहे. तसेच मंत्री झालेल्या विखेंना खाते कोणते मिळणार, याचीही त्यांच्या समर्थकांना उत्सुकता आहे. आतापर्यंत त्यांनी कृषी व जलसंधारण, दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, शालेय शिक्षण, विधी व न्याय, परिवहन, बंदरे, कृषी व पणन, गृहनिर्माण अशा विविध खात्यांची मंत्रिपदे भूषवली आहे. अर्थ, महसूल, गृह, जलसंपदा, आदिवासी विकास, महिला व बालकल्याण अशा वजनदार खात्यांचा भार अजून त्यांनी सांभाळलेला नाही. त्यामुळे यावेळी त्यांच्या वाट्याला येणारे मंत्रिपद चर्चेचा विषय झाला आहे.

COMMENTS