मुंबई : ज्येष्ठ अभिनेता गोविंदा मंगळवारी पहाटे थोडक्यात बचावला. गोविंदा याच्या रिव्हॉल्व्हरमधून सुटलेली गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. त्यानंतर
मुंबई : ज्येष्ठ अभिनेता गोविंदा मंगळवारी पहाटे थोडक्यात बचावला. गोविंदा याच्या रिव्हॉल्व्हरमधून सुटलेली गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. त्यानंतर जखमी अवस्थेत जुहू येथील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करुन गुडघ्यात शिरलेली गोळी बाहेर काढण्यात आली. आता गोविंदाची प्रकृती स्थिर आहे.
गोविंदा यांच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी नेमकी कशी सुटली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी गोविंदा यांच्याकडी पिस्तुल ताब्यात घेतले होते. त्याची तपासणी केल्यानंतर गोविंद यांच्या पिस्ुतलाचा लॉकचा लहानसा भाग तुटल्याचे दिसून आले. याच कारणामुळे गोविंदा यांच्या पिस्तुलातून अचानक गोळी सुटली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, गोविंदा हे मंगळवारी पहाटे 5:45 वाजताच्या विमानाने कोलकाता येथे जाणार होते. त्यासाठी ते साडेचार वाजता तयार होऊन घरातून बाहेर पडणार होते. गोविंदा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना घडली तेव्हा जुहू येथील घरात त्यांच्यासोबत मुंबई पोलिसांकडून पुरवण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांपैकी एकजण उपस्थित होता. गोविंदा पहाटे घराबाहेर पडत होते तेव्हा ते त्यांच्या कपाटात एक सुटकेस ठेवत होते. तेव्हा कपाटातील रिव्हॉल्व्हर खाली पडली आणि त्याच्यातून गोळी सुटली. गोविंदा यांच्या पायाला गोळी लागल्यानंतर त्यांच्या सुरक्षारक्षकाने त्यांना रुग्णालयात दाखल केले आणि पोलिस कंट्रोल रुमला घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. आतापर्यंतच्या पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गोविंदा यांच्याकडील रिव्हॉल्व्हरमध्ये एकूण सहा गोळ्या होत्या. ही बंदूक लोड करुन ठेवण्यात आली होती. पोलिसांनी बंदुकीचा परवाना तपासून पाहिला, तो वैध आहे. ही पिस्तुल खूप जुनी आहे. गोविंदा यांना नवीन रिव्हॉल्व्हर विकत घ्यायची होती. मात्र, त्यापूर्वीच हा अपघात झाला.
गोविंदा यांच्यावर दीड तास शस्त्रक्रिया
गोविंदा यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टर अग्रवाल यांनी माध्यमांशी संवाद साधतांना सांगितले की, पहाटे पाच वाजता गोविंदा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर दीड तास शस्त्रक्रिया करुन त्यांच्या गुडघ्याच्या वरील भागातून गोळी बाहेर काढण्यात आली. गोविंदा यांना आठ ते दहा टाके पडले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून दोन-तीन दिवसांमध्ये त्यांना घरी सोडण्यात येईल.
COMMENTS