Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महापालिका लेटलतिफ 14 अधिकार्‍यांवर कारवाई

नाशिक प्रतिनिधी - प्रभारी आयुक्त पदाचा कार्यभार असला तरी महापालिकेच्या कामकाजाला शिस्त लावण्यासाठी राधाकृष्ण गमे यांनी घेतलेल्या भूमिकेतून चौदा अ

स्वच्छता अभियान ही लोकचळवळ व्हावी : डॉ. सागर बोरुडे
कर्नाटक भाजपमधील बंडाळी
भररस्त्यात अचानक पेटली कार अन्….

नाशिक प्रतिनिधी – प्रभारी आयुक्त पदाचा कार्यभार असला तरी महापालिकेच्या कामकाजाला शिस्त लावण्यासाठी राधाकृष्ण गमे यांनी घेतलेल्या भूमिकेतून चौदा अधिकारी व कर्मचारी लेटलतिफ निघाले. त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अतिक्रमण उपायुक्त करुणा डहाळे, नगररचना सहाय्यक संचालक कल्पेश पाटील, शिक्षण प्रशासनाधिकारी सुनीता धनगर, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. आवेश पलोड यांचा समावेश आहे. महापालिकेचे नियमित आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेले आहे. त्या कालावधीत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे पदभार आहे. शुक्रवारी गमे यांनी सकाळी दहाच्या सुमारास विभागप्रमुखांची बैठक बोलाविली. त्या वेळी अतिक्रमणासंदर्भात प्रश्‍न आल्यानंतर उपायुक्तांना बोलाविले. दोनदा बोलावूनही डहाळे आल्या नाही. तिसर्‍या हाकेला आल्यानंतर डहाळे यांनी कार्यालयातच होते, परंतु निरोप मिळाला नसल्याचे सांगितले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर डहाळे या महापालिका मुख्यालयात 11.13 मिनिटांनी आल्याचे दिसून आले. डहाळे खोटे बोलल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर शुक्रवारी झालेल्या अचानक तपासणीत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. आवेश पलोड यांच्यासह सात कर्मचारी गैरहजर आढळले. सोमवारी (ता.15) देखील अचानक तपासणी करण्यात आली. त्यात नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक कल्पेश पाटील, शिक्षण प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांच्यासह सात जण नियुक्त ठिकाणी आढळले नाहीत. त्यामुळे या सर्वांचे एक दिवसांचे वेतन कपात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कालिदास कलामंदिराचे व्यवस्थापक जगन्नाथ कहाणे यांचा कार्यभार काढण्यात आला आहे. कालिदास कलामंदिराचे अकरा कोटी रुपये खर्च करून पुनर्निर्माण करण्यात आले आहे. रविवारी एका कार्यक्रमात वातानुकूलित यंत्रणा बंद पडली. परिणामी श्रोते घामाघूम झाले. श्रोत्यांनी तिकिटाचे पैसे परत मागितल्याने गोंधळ उडाला. सदर प्रकार घडल्यानंतर कालिदासचे व्यवस्थापक जगन्नाथ कहाणे रजेवर असल्याचे समोर आले. त्यातही रजेवर जाताना अन्य व्यक्तीकडे प्रभारी पदभार देणे गरजेचे असताना तोदेखील दिला नाही. त्याचबरोबर वातानुकूलित यंत्रणा देखभाल- दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया राबविली गेली नसल्याने जबाबदारी निश्‍चितीच्या सूचना दिल्या असून, त्यातून त्यांचा कार्यभार काढण्यात आला आहे. अचानक केलेल्या तपासणीत 14 कर्मचारी अनुपस्थित आढळले असून, कार्यालयीन शिस्तीचा भाग म्हणून एक दिवसाचे वेतन कपात केले जाणार आहे.

COMMENTS