मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (५२) यांचे अपघाती निधन झाले. रविवारी सकाळी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे-वर भाताण बोगद्याजवळ हा अपघात झाल्य
मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (५२) यांचे अपघाती निधन झाले. रविवारी सकाळी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे-वर भाताण बोगद्याजवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य भाजपा आणि शिवसंग्रामचे नेते एमजीएम रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी अपघाताशी संबंधित माहिती घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे विनायक मेटे आणि त्यांचे सुरक्षारक्षक बीडहून मुंबईकडे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने होणाऱ्या महत्वपूर्ण बैठकीसाठी येत होते. यावेळी पहाटे पाच वाजताच्या सुमारास गाडीला अपघात झाला. अपघातानंतर तब्बल एक तास त्यांना मदत मिळाली नसल्याचे त्यांच्या गाडीच्या चालकाकडून सांगण्यात आले. अखेर त्यांना नवी मुंबईनजीक एमजीएम रुग्णालयात आणण्यात आले. मात्र त्यापूर्वी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे डाॅक्टरांनी जाहीर केले. महामार्गावरील पनवेल ते खालापूर दरम्यानच्या बोगद्याजवळ हा अपघात घडला. पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गाडीच्या डाव्या बाजूचा भाग चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत मिळाली नसल्याचे चालकाचे म्हणणे आहे. त्यानंतर त्यानंतर एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती.
रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी माध्यमांना सांगितले की, सकाळी ५ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मारहाण झाली. त्यांना रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्यांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षारक्षक गंभीर जखमी आहेत. तर चालकाची स्थिती स्थिर आहे.
तातडीने मदत मिळाली नसल्याचा चालकाचा आरोप
चालकाने दिलेल्या माहितीनुसार, ट्रकच्या बंपरमध्ये आमची गाडी अडकली आणि आम्हाला फरपटत नेले. त्यानंतर मी पोलिसांना १०० नंबरवर कॉल केला, पण त्यांची मदत लवकर मिळाली नाही. तब्बल एका तासानंतर आम्हाला मदत मिळाली.
कोण होते विनायक मेटे
विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते. ३० जून १९७० रोजी जन्म झाला होता. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी होते. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केली. अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते. सर्वप्रथम शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात विधानसभेत आमदार होते. त्यानंतर सलग पाच वेळा विधानपरिषद सदस्य होते.
COMMENTS