कर्जत : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्व सांगताना विद्ये विना मती गेली, या उक्तीप्रमाणे शिक्षणाचे असाधारण महत्त्व अधोरेखि
कर्जत : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्व सांगताना विद्ये विना मती गेली, या उक्तीप्रमाणे शिक्षणाचे असाधारण महत्त्व अधोरेखित केले आहे. या प्रसंगी विद्यार्थ्यांना नेहमी आईवडिलांच्या कष्टाची जाण असावी व गुरुंप्रति कृतज्ञता असणे हे गुणधर्म एक चारित्र्यवान व्यक्तिमत्व घडविण्यास मदत करते, असे प्रतिपादन डॉ. शंकरराव नेवसे यांनी केले.
5 एप्रिल 2024 रोजी श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न सद्गुरु कृषि महाविद्यालय व शिवशंकर कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमानिमित्त महाविद्यालयात विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे व डॉ. संजय कळमकर, संस्थेचे संस्थापक डॉ. शंकरराव नेवसे, कल्याणी नेवसे, राजेंद्र गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी सदगुरू कृषि महाविद्यालयाचा 15 वा वार्षिक अंक ऋणानुबंधाचे विमोचन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. शंकरराव नेवसे यांनी माणसाने जीवन जगत असता कुटुंबाबरोबरच सामाजिक ऋणानुबंध देखील जोपासले पाहिजे असे नमूद केले. 6 एप्रिल रोजी शैक्षणिक उपक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी सद्गुरु महाविद्यालय येथे अंतर्नाद या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय ख्याती असलेले लेखक व कथा कथनकार डॉ. संजय कळमकर हे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. संजय कळमकर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळावी यासाठी उत्तम मार्गदर्शन तथा योग्य आदर्शाची निवड अत्यंत महत्त्वाचे आहे, असे आपल्या गोष्टी व कवितेतून आव्हान केले. आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कृषि क्षेत्रामध्ये संशोधन विस्तार व ग्रामीण उद्योजकता विकास यासाठी मोठा वाव आहे, असे मत डॉ. शंकरराव नेवसे यांनी सदगुरू कृषि महाविद्यालयचा विद्यार्थी कृषि क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेतृत्व करेल असा विश्वास व्यक्त करताना यासाठी आवश्यक अशा सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले. या कार्यक्रमाप्रसंगी सौ. कल्याणी नेवसे व राजेंद्र गोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रम औपचारिकते नंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध पटकथा, कथाकथन, नृत्य, नाटक व गायन आदी सांस्कृतिक कलांचे सादरीकरण केले. या दोन्ही कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रामदास बिटे यांनी केले. तसेच प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. सागर खराडे यांनी करून दिला. आभार प्रा. चांगदेव माने यांनी मानले. या भव्य वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाच्या कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे प्रशासन अधिकारी, समन्वयक, प्राचार्य, ग्रामस्थ, पत्रकार, महाविद्यालयातील सर्व प्रा. कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS