छत्रपती संभाजीनगर : जगाला हेवा वाटावा असा चारित्र्यसंपन्न, संघटित आणि बलशाली समाज उभारण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यासाठी प्रत्येकाने आप

छत्रपती संभाजीनगर : जगाला हेवा वाटावा असा चारित्र्यसंपन्न, संघटित आणि बलशाली समाज उभारण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या स्वभावात व आचरणात सकारात्मक बदल घडवून आणला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिंदू समाजाची भूमिका महत्त्वाची असून समाजपरिवर्तनाची सुरुवात स्वतःच्या आचरणातूनच व्हायला हवी, असे त्यांनी स्पष्ट केले.
हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती व मूल्यांचे संरक्षण आणि संवर्धन या उद्देशाने हिंदू संमेलन समिती, गंगापूर यांच्या वतीने गंगापूर येथे भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनास डॉ. मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महंत रामगिरी महाराज, जगद्गुरु श्री श्री 1008 शांतिगिरी महाराज, गाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत तसेच आमदार प्रशांत बंब उपस्थित होते. या संमेलनामागील उद्देश हिंदू समाजातील विविध घटकांना संघटित करून धर्मजागृतीसाठी सक्रिय सहभाग घ्यावा हा असल्याचे संयोजकांनी सांगितले. समाजप्रबोधन, संस्कृतीरक्षण आणि राष्ट्रभक्तीचे विचार या संमेलनातून मांडण्यात आले. जिल्हा परिषद मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. मार्गदर्शन करताना डॉ. भागवत म्हणाले की, समाजपरिवर्तनासाठी केवळ भाषण नव्हे, तर प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे. समानता केवळ शब्दांत न राहता कृतीत उतरली पाहिजे. सर्व जाती-पातींतील लोकांमध्ये मैत्रीभाव वाढवणे, समाजात सद्भावना निर्माण करणे आणि कुटुंबातून संस्कारांची परंपरा जपणे गरजेचे आहे. जीवनशैलीत पर्यावरणाची हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, स्वदेशी वस्तूंना प्राधान्य द्यावे आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी, असे त्यांनी सांगितले. आत्मनिर्भरतेसाठी आत्मनिर्भयता आवश्यक असून, या मूल्यांचा आचरणात स्वीकार केल्यासच समाज खर्या अर्थाने बलशाली बनेल, असे त्यांनी नमूद केले. जाती-पातीमुळे विभागलेल्या हिंदू समाजाने आता संघटित होऊन सामाजिक सौहार्द आणि करुणेच्या भावनेने पुढे जाण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

COMMENTS