मुंबई दि. २९ : – माळशेज घाट हे ठाणे आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर, कल्याण-नगर महामार्गावर वसलेले पश्चिम घाटातील एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. या

मुंबई दि. २९ : – माळशेज घाट हे ठाणे आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर, कल्याण-नगर महामार्गावर वसलेले पश्चिम घाटातील एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणचे पर्यटनदृष्ट्या महत्त्व लक्षात घेऊन माळशेज घाटातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विश्रामगृहाच्या शेजारील टेकडीवर रिकाम्या जागेत काचेचा स्कायवॉक उभारण्यात यावा. सार्वजनिक – खासगी भागीदारी तत्वावर या स्कायवॉकची उभारणी करण्यासाठी एक महिन्यात एकत्रित प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
माळशेज घाटामध्ये काचेचा स्कायवॉक बांधण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार मार्गदर्शन करताना म्हणाले की, माळशेज घाट हा मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि अहमदनगर या प्रमुख शहरांच्या जवळ आहे तसेच घाटाच्या जवळच शिवनेरी किल्ला, हरिश्चंद्रगड, विविध धबधबे, पिंपळगाव जोगा धरण इत्यादी पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे स्कायवॉक झाल्यास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील आणि पर्यटनाला चालना मिळेल. या भागाच्या विकासासाठी पर्यटन विभागाने एकत्रित प्रस्ताव सादर करावा. सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग (राष्ट्रीय महामार्ग) यांनी या प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता तपासून प्रस्ताव सादर करावा,असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
स्कायवॉक प्रकल्प उभारताना त्यातून इको सेन्सिटिव्ह भाग वगळावा तसेच या प्रकल्पामध्ये वन विभागाचे अभिप्राय लक्षात घेऊन ठाणे जिल्हाधिकारी यांनी वन विभागाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.
या बैठकीस आमदार किसन कथोरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव राजेश देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, सार्वजनिक बांधकाम ( राष्ट्रीय महामार्ग) विभागाच्या अधीक्षक अभियंता तृप्ती नाग व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
COMMENTS