कर्जत : येथील सदगुरु कृषी महाविद्यालय व से-ट्री संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. शैक्षणिक कार्यासोबतच स

कर्जत : येथील सदगुरु कृषी महाविद्यालय व से-ट्री संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. शैक्षणिक कार्यासोबतच समाजाभिमुख उपक्रमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सदगुरु कृषी महाविद्यालयाने नववर्ष २०२६ च्या सुरुवातीलाच, शुक्रवार (ता. ३) रोजी आपल्या सभागृहात पहिल्या शेतकरी मेळाव्याचे यशस्वी आयोजन केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत शेती व शिक्षण यांचा सुरेख मिलाफ घडवून आणणारा हा कार्यक्रम लोकाभिमुख ठरला. सदगुरु कृषी महाविद्यालय व से-ट्री संस्थेच्या वतीने विशेषतः आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्यात से-ट्री संस्थेचे समन्वयक आबा लाड, तंत्र प्रमुख वृषभ मांडवे, प्रोजेक्ट मॅनेजर विनोद सुभेदार यांनी आंबा पिकाची लागवड, निगा, खत व्यवस्थापन, पाणी नियोजन व संवर्धन याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच सदगुरु कृषी महाविद्यालयातील प्रा. डॉ. गोलापेल्ली रवी (कीटकशास्त्रज्ञ), प्रा. डॉ. सागर कारंडे (वनस्पती रोगशास्त्रज्ञ) आणि प्रा. सचिन आढाव (मृदा व खत व्यवस्थापन) यांनी शेतकऱ्यांना उपयुक्त व शास्त्रीय माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शंकरराव नेवसे होते. यावेळी संस्थेचे सचिव ह. भ. प. राजेंद्रजी गोरे, प्रशासकीय अधिकारी सखाराम राजळे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात डॉ. शंकरराव नेवसे म्हणाले, “आमचे जीवन शेतकऱ्यांशी घट्टपणे जोडलेले आहे. दुग्ध व्यवसाय असो वा कृषी क्षेत्र, शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत करण्यासाठी आमची संस्था सदैव कटिबद्ध राहील.” तर सचिव राजेंद्रजी गोरे यांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या काव्यपंक्तीच्या माध्यमातून शेती व अध्यात्म यांचा सुंदर संबंध उलगडून सांगितला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सागर कारंडे यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. रामदास बिटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. पूजा इनामके यांनी केले. या मेळाव्यास शेतकरी, विद्यार्थी, पालक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS