नांदेड/प्रतिनिधी ः आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहणारे कालीचरण महाराज आता अडचणीत सापडले आहेत. नांदेडमध्ये जिल्ह्यातील बिलोली येथे

नांदेड/प्रतिनिधी ः आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहणारे कालीचरण महाराज आता अडचणीत सापडले आहेत. नांदेडमध्ये जिल्ह्यातील बिलोली येथे आयोजित धर्मसभेत चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिलोली येथे 9 एप्रिल रोजी राम नवमीनिमित्त ही धर्मासभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत प्रमुख वक्ते म्हणून कालीचरण महाराज यांनी भाषण केले होते.धर्मसभेत चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन कालीचरण महाराज यांच्याविरोधात बीलोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालीचरण महाराज यांच्याविरोधात दंगल भडकणे, विशिष्ट समजाच्या भावना दुखावणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालीचरण महाराजांवर कलम 153 अ, 295 अ आणि 505- 2 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन ही कारवाई केली आहे. त्यामुळे पोलिस कालीचरण महाराजांव काय कारवाई करणार?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पोलिस तक्रारीनुसार, नांदेड येथील रामनवमीनिमित्त आयोजित धर्मसभेत कालीचरण महाराजांनी एका समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. भारतात दंगली एका विशिष्ट समाजामुळेच होतात, असे कालीचरण महाराज म्हणाले होते. कालीचरण महाराजांनी त्यांच्या भाषणादरम्यान लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याआधी कालीचरण महाराजांनी रायपूर येथील धर्मसंसदेत महात्मा गांधींसंदर्भात खालच्या पातळीवर वक्तव्य केले होते. त्यांनी भारताच्या फाळणीसाठी महात्मा गांधींना जबाबदार ठरवले होते. महात्मा गांधींचा एकेरी शब्दात उल्लेख करून त्यांचे मारेकरी नथुराम गोडसे यांना वंदन करतो, असे वक्तव्य कालीचरण महाराजांनी केले होते. अलिगढ येथे भारतात केवळ सनातन धर्म आहे. इस्लाम, ख्रिश्चन हे धर्मच नाहीत. भारत पाकिस्तान युद्ध झाले तर इथले मुसलमान पाकिस्तानला साथ देतील, असे वक्तव्य केले होते. अहमदनगर येथे कालीचरण महाराज म्हणाले, लव जिहादासाठी वशीकरण आणि जादूटोण्याचा वापर केला जातो. आता याच्यावर उपाय काय तर त्यासाठी डुकराचा दात रात्रभर पाण्यात ठेवा आणि सकाळी ते पाणी मुलीला प्यायला द्या, मग बघा डोके ठिकाणावर येईल, असे वक्तव्य त्यांनी केले होते. देवी देवता हिंसक होते, म्हणून आपण त्यांची पूजा करतो. देशासाठी आणि धर्मासाठी हत्या केली तर त्यात गैर काहीच नाही, असे वक्तव्य अमरावती येथे शौर्य यात्रेत केले होते. कालीचरण महाराजांचे मूळ नाव अभिजीत धनंजय सराग असून ते अकोला शहरातील शिवाजीनगरमध्ये भावसार पंचबंगला भागात राहतात. ते एका सर्वसामान्य कुटुंबातील होते. त्यांच्या वडीलांचे औषधांचे दुकान आहे. कालीचरण महाराजांचा लहानपणापासून अध्यात्माकडे अधिक ओढा होता. कालीचरण महाराजाने जिल्हा परिषद शाळेत आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे.
COMMENTS