Homeताज्या बातम्यासंपादकीय

मान्सूनचे शुभवर्तमान

राजधानी दिल्लीचे तापमान 52.3 अंशांवर पोहोचल्यानंतर तरी आपण तापमानवाढ रोखण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आता जाणवू लागली आहे. एकीकडे उष्णतेमुळे जीवा

बंडखोरीची टांगती तलवार !
एन्काउंटर व्यवस्थेचा की प्रवृत्तीचा ?
नीती आयोग आणि संघर्ष

राजधानी दिल्लीचे तापमान 52.3 अंशांवर पोहोचल्यानंतर तरी आपण तापमानवाढ रोखण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आता जाणवू लागली आहे. एकीकडे उष्णतेमुळे जीवाची काहिली होत असतांना दुसरीकडे मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यामुळे अनेकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. गेल्या वर्षी अपुरा पाऊस झाल्यामुळे शेतकरी कोलमोडला होता. महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा लागला होता. एप्रिल आणि मे महिन्यात तर पाणीटंचाई आणि चाराटंचाई असे दुहेरी संकट आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळे सरकारदरबारी प्रभावी उपाययोजना राबवण्यात आलेल्या नाही. हंड्याभर पाण्यासाठी शेतकर्‍यांनी वण-वण केल्याचे दिसून येत आहे. त्यातच मान्सून वेळेआधीच दाखल झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. तरीदेखील महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी अजूनही 10-12 दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे तोपर्यंत शेतकर्‍यांना पाणीटंचाई आणि चाराटंचाईच्या प्रश्‍नांना सामोरे जावे लागणार आहे. खरंतर दुष्काळ, अतिवृष्टी या नित्याच्याच बाबी झाल्या आहेत. आणि त्याला कारणीभूत तापमान आहे.

त्यामुळे आताच्या सरकारने आपले प्राधान्यक्रम बदलण्याची गरज आहे. सर्वात प्रथम तापमानवाढ रोखणे, वृृक्षांची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देणे, लोकसंख्यावाढ रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची खरी गरज आहे. तरच भविष्यातील पिढ्या आपल्या वाचणार आहे. जर तापमान वाढ अशीच होत राहिल्यास नैसर्गिकि आपत्ती मोठया प्रमाणावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाश्‍वत विकासाच्या दिशेने पावले उचलण्याची गरज आहे. शतकातील सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून 2023 वर्ष नोंदवण्यात आले होते. मात्र त्याचा विक्रम अवघ्या एका वर्षात मोडीस निघावा यासारखी शोकांतिका नाही. रेमल चक्रीवादळामुळे अनेकठिकाणी काही प्रमाणात गारवा वाढला होता, त्यानंतर मात्र तापमान 45 अंशांच्यावर गेल्याचे पाहायला मिळाले. राजधानीत तर  थेट 52.3 टक्के तापमानवाढ नोंदवण्यात आली. तापमानवाढीमुळे अन्न असुरक्षितता, हवामानातील परिवर्तनशीलता याचा अनुभव आपल्याला येतांना दिसून येत आहे. पिकांचा बेभरवसा,  अन्न असुरक्षितता, दुष्काळ आणि पूर यांसारख्या टोकाच्या हवामानासंबंधीच्या घटना- विशेषत: असुरक्षित लोकांच्या समस्या अधिक वाढवतांना दिसून येत आहे. याला कारणीभूत जंगलतोड, पशुधन संवर्धनात अपयश आणि कृत्रिम खतांचा वापर, विषारी औषधांची फवारणी, यामुळे मानवी जीवन जटील बनतांना दिसून येत आहे. शाश्‍वत शेतीकडे देखील आपण वळण्याची गरज आहे. जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड वायू कमी करण्यासाठी उपाय करावे लागतील. यातील एक उपाय म्हणजे वृक्षारोपण. सध्याचे कार्बन डाय-ऑक्साइडचे वातावरणातील प्रमाण थोपवायचे तर त्याची निर्मिती कमी करणे आवश्यक आहे. जंगलाखालील भूमी सध्याच्या तीन ते पाच पट वाढवायला हवी. सध्याच्या युगात कोणताही देश ऊर्जेचा वापर कमी करून आपली प्रगती खोळंबून घेणार नाही. अभ्यासातील पाहणीनुसार विकसित देशांचा ऊर्जेचा वापर हा विकसनशील देशांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. परंतु वापराचे प्रमाण स्थिरावले आहे. या देशांपुढील मोठा प्रश्‍न आहे तो म्हणजे ऊर्जेचा वापर कमी कसा करायचा जेणेकरून हरितवायूंचे प्रमाण कमी होईल. भारत, चीन या देशांत दरडोई वापर कमी असला तरी वापराचे प्रमाण हे दरवर्षी लक्षणीय प्रमाणात वाढते आहे.

ऊर्जा निर्मितीसाठी मुख्यत्वे कोळसा व पेट्रोल यांचे ज्वलन केले जाते. या ज्वलनातून कार्बन डाय-ऑक्साइडचे उत्सर्जन होते. सध्या शास्त्रज्ञांकडून सुचवलेल्या उपायांवर ज्वलन प्रक्रिया व कार्बन डाय-ऑक्साइड वातावरणात जाण्यापासून रोखणार्‍या प्रक्रियांचा विकास चालू आहे. या प्रक्रियांमध्ये मुख्यत्वे कोळशाच्या ज्वलनानंतर त्यांतील कार्बन डाय-ऑक्साइड वेगळा करायचा व वेगळा झालेला कार्बन डाय-ऑक्साइड भूगर्भातील मोकळ्या खाणींमध्ये साठवून ठेवायचा. कार्बन डाय-ऑक्साइड वेगळे करण्यासाठी विविध तंत्रे आहेत. यासोबतच कार्बन डाय-ऑक्साइडला ज्वलनानंतर रोखणे व त्याची साठवण करणे हे वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये शक्य आहे कारण तेथे मोठ्या प्रमाणावर प्रदूषकांची निर्मिती होते. ही निर्मिती केंद्रीय प्रकारची असल्याने त्यावर उपाय शोधणे सोपे आहे. परंतु वाहनांमध्येही ज्वलन होत असते व तेही कार्बन डाय-ऑक्साइड चे उत्सर्जन करतात. हायड्रोजन हे एक प्रभावी इंधन आहे. हायड्रोजनच्या ज्वलनाने फक्त पाण्याची निर्मिती होते. पाण्याच्या विघटनातून, पेट्रोलियम पदार्थांतून तसेच जैविक पदार्थांमधून हायड्रोजनची निर्मिती करता येते. यातून आपण कार्बन उत्सर्जन रोखू शकतो. मात्र या सर्व उपायांयासोबतच वृक्षलागवड करणे अतिशय गरजेचे आहे.

COMMENTS