ग्लोबल वार्मिंग हा शब्द आता परवलीचा होत चालला आहे. जगभरातील तापमान हे सातत्याने वाढत आहे आणि आता भारतात देखील तापमानाची कमालच झाली. काल दिल्लीच्य

ग्लोबल वार्मिंग हा शब्द आता परवलीचा होत चालला आहे. जगभरातील तापमान हे सातत्याने वाढत आहे आणि आता भारतात देखील तापमानाची कमालच झाली. काल दिल्लीच्या तापमानात ५२.३ डिग्री सेल्सिअस एवढी नोंद करण्यात आली. यासाठी जे कारण देण्यात आलं, त्यामध्ये राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे दिल्लीचे तापमान वाढल्याचे सांगण्यात आले असले तरी, प्रत्यक्षात हे कारण संशयीत आहे. प्रत्यक्षात राजस्थानमधील देखील दोन शहरांचे तापमान ५० डिग्री सेल्सिअस च्या पुढे गेले. फालदी येथील तापमान ५१.२ एवढे होते; तर दुसरे शहर हरियाणातील सिरसा येथील तापमान ५०.८ डिग्री सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. जगभरामध्येच अल निनो आणि ला न्यानो या दोन प्रकारच्या वातावरणामुळे दरवर्षी जगाचे तापमान एक ते दीड डिग्री सेल्सिअस ने वाढत चालले आहे. याचा परिणाम ध्रुवीय खंडावर बर्फ वितळण्यातही होत आहे. त्यामुळे जगातल्या अनेक शहरांमध्ये अकाली पाऊस आणि महापूर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. भारतासारख्या देशातही आगामी काळात तापमान वाढल्यामुळे पावसाची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच ढगफुटी सारखा पाऊस देशाच्या विविध भागात झाला. याच महिन्यात महाराष्ट्रातील चिपळूणसारख्या भागात देखील ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. वातावरणातील तापमान आणि अकाली पाऊस आणि त्यात होणारी वाढ ही आपण नुकतीच दुबई शहराच्या अनुषंगानेही अनुभवली आहे.
जगातील पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात झाल्याचे शास्त्रज्ञ आणि निसर्ग तज्ञ व निसर्गप्रेमी वारंवार सांगत असतात. परंतु, मानवी समाज रचनेमध्ये या गोष्टींकडे विकासाच्या मागे लागल्याने, फार कमी लक्ष देण्यात येते. भारताचीच परिस्थिती जर पाहिली तर गेल्या काही वर्षांपासून रस्त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात निर्माण केले जात आहे. चारपदरी, सहा पदरी, आठ पदरी रस्ते अथवा महामार्ग निर्माण करण्यासाठी लाखो झाडांची प्रत्यक्षात कत्तल करण्यात येते. मात्र या मोबदल्यात नवीन झाडांची निर्मिती होत नाही. शिवाय आठ पदरी रस्ते हे मध्ये मध्ये कुठल्याही प्रकारची हिरवळ किंवा झाडेझुडपे न लावताच निर्माण केली जात आहे. त्यातच उन्हाच्या तापमानामुळे रस्त्यावरून होणारे तापमानाचे रिफ्लेक्शन वातावरणातील तापमान आणखी वाढवते. शिवाय अनेक महानगरांमध्ये उभे राहणारे टॉवर्स यामध्ये काचेची लावलेली तावदाने ही प्रत्यक्षात त्या शहराचे तापमान वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात. निसर्गाच्या तापमानापेक्षाही माणसाने प्रगतीच्या नावाखाली ज्या ज्या गोष्टी चालवल्या आहेत, त्याच्या दुष्परिणामातून तापमान अधिक वाढते आहे. हे तापमान कमी करण्यासाठी झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यासाठी, मात्र जगभरातला मानव समुदाय अपूर्ण पडत आहे. अनेक वेळा अनेक देशांच्या जंगलांमध्ये वणवा पेटतो. या वणव्यामागे देखील पृथ्वीवरच्या तापलेल्या तापमानाचेच कारण अधिक आहे. दक्षिण आफ्रिकेचे आणि त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाचे लाखो एकर झाडांची आणि जंगलांची जळून राख झाली. जगातला सर्वाधिक ऑक्सिजन देणारा प्रदेश म्हणून अमेझॉनच्या जंगलाला देखील काही दिवसांपूर्वी आग लागली होती. जगाच्या एकूण ऑक्सिजन मधील २५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन केवळ या जंगलात निर्माण होतो. तरीही, या जंगलाला वणवा भडकला आणि त्याचा परिणाम जगभरातल्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीवरच्या ऑक्सिजनमध्ये निश्चितपणे कमतरता येईल. ऑक्सिजनचे महत्त्व नेमकं काय असतं, हे सबंध जगाने कोरोना काळात प्रत्यक्षात अनुभवले आहे. केवळ, ऑक्सिजनच्या सिलेंडर अभावी जगातील लाखो लोकांचे तडफडून रुग्णालयाच्या बेडवर मृत्यू झाले आहेत. हे वास्तव कोरोनाने अधोरेखित केले आहे. दिल्लीचे कालचे तापमान देशाची चिंता वाढवणारी आहे. एवढ्या तापमानामध्ये शहरांमध्ये बाहेर फिरणारा माणूस तो गरीब असो अथवा श्रीमंत त्याला उन्हाची धग लागल्याशिवाय राहू शकत नाही. उष्माघाताचे प्रमाण हे यामुळे मोठ्या प्रमाणात वाढू शकते. हे कारण लक्षात घेता त्या त्या ठिकाणच्या प्रशासनाने दुपारी बारा ते पाच या वेळेदरम्यान कुणीही रस्त्यावर घेऊ नये, अशा सूचना काढल्या असल्या तरी, प्रत्यक्षात कष्टकरी समुदायाला या गोष्टींचं पालन करणे शक्य होत नाही. जगाचे आणि देशाचेही बदललेले आणि वाढत चाललेले हे तापमान आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने चिंतेचे कारण आहे. त्यामुळे आपण सगळेजण किमान मानसी एक एक झाड लावले तरी या देशात १४० कोटी झाडे एका दिवसात लावले जाऊ शकतात. परंतु या संदर्भात आपण प्रत्येकाने जर गांभीर्याने हे लक्षात घेतले तरच ते शक्य आहे.
COMMENTS