राहाता ः राहाता नगरपरिषदेच्या कातनाला पाणी साठवण तलावात फक्त पाच टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने राहतेकरांवर आता भीषण पाणी टंचाईचे संकट घोंगावणार
राहाता ः राहाता नगरपरिषदेच्या कातनाला पाणी साठवण तलावात फक्त पाच टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने राहतेकरांवर आता भीषण पाणी टंचाईचे संकट घोंगावणार आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने सिंचन विभागाला कातनाल्यात गोदावरी उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने अर्थात नगरपरिषद प्रशासनाने पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र गोदावरी कालव्याला पाणी सुटून दोन-तीन दिवस झाले तरीसुद्धा नगर परिषदेच्या पाणी साठवण तलावात पाणी न सोडल्याने राहाता शहरवासीयांना भीषण व तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे.
सध्या तीन दिवसाआड मिळणारे पाणी भविष्यात वेळेत जर कालव्यातून साठवण तलावात सोडले नाही तर, दहा दिवसांनी पाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. राहता नगरपरिषद हद्दीत सुमारे 30 हजार लोकसंख्या आहे. सार्वजनिक नळ असा सर्व मिळून जर विचार केला तर दैनंदिन किमान 25 लाख लिटर पाणी राहाता शहराला लागते. तसेच जलकुंभामध्ये अंदाजे पंचवीस लाख लिटर पाणी साठवून ठेवावे लागते, तेव्हा कुठे शहराला पूर्ण दाबाने व वेळेवर तसेच वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा करता येतो. राहाता नगरपरिषद हद्दीत पंधरा चारी चौधरी वस्ती आंबेडकर नगर तसेच पाणीपुरवठा फिल्टर हाऊस या ठिकाणी मिळून एकूण पाच जलकुंभ आहेत याची सर्वसाधारण क्षमता अंदाजे वीस लाख लिटरपर्यंत आहे. राहाता नगरपरिषद हद्दीतील सर्व नळ धारकांना या साठवण तलावातून पाणीपुरवठा होतो मात्र सध्या फक्त पाच टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातही एक-दोन टक्के मृत पाणीसाठा असल्याने तो वापरण्यास अयोग्य आहे याचा सारासार विचार केला तर साठवण तलावात असलेल्या पाण्यापैकी दोन टक्केच पाणी वापरा योग्य आहे. जर येत्या एक दोन दिवसात पाणी आले नाही तर, शहरवासीयांना दहा दिवसात पाणी देण्याची नामुष्की नगरपरिषद प्रशासनावर व पाणीपुरवठा विभागावर येईल. हे तीव्र व भीषण पाणीटंचाईचे उद्भवणारे संकट टाळण्याकरिता नगरपरिषद प्रशासन सिंचन विभागाला वारंवार व समक्ष भेटून विनंती करत असल्याचे समजते. सिंचन विभागाने तातडीने गोदावरी उजव्या कालव्यातून राहाता नगरपरिषदेच्या पाणी साठवण तलावात पाणी सोडून राहतेकरांवर उद्भवणारे संकट दूर करावे म्हणजे बरं होईल, अन्यथा नगरपरिषद प्रशासनाबरोबरच सिंचन विभागालाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या उकाड्याने नागरिक हैराण होत असून उन्हाची तीव्रता वाढली आहे, त्यात मागील वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने भूजल पातळी खालवलेली आहे. परिणामी नगरपरिषद हद्दीतील अनेक खाजगी कुपनलिका तसेच विहिरी यांची सुद्धा पाणी पातळी खोल गेले असून काही ठिकाणी तर स्वप्नाली का आटल्याने व विहिरी कोरड्या झाल्या. नागरिकांना स्वतःच्या कुपनलिका व विहीर असतानाही पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे, अशा परिस्थितीत ही पाण्याची उद्भवणारी गंभीर समस्या सुटणे गरजेचे आहे अन्यथा मोठ्या संकटाला राहते करांना सामोरे जावे लागेल हे मात्र तितकेच खरं.
COMMENTS