मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण आणि संकलक विभागाने मालमत्ता करवसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र असे असले तरी करवसुलीमध्ये सुमारे 21
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण आणि संकलक विभागाने मालमत्ता करवसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र असे असले तरी करवसुलीमध्ये सुमारे 2100 कोटी रुपयांची तूट आहे. चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक असून मुंबई महानगरपालिकेला या तीन दिवसांत 4500 कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठावे लागणार आहे.
पालिकेच्या करनिर्धारण आणि संकलक विभागाने चालू आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यास 27 फेब्रुवारीपासून सुरुवात केली. तसेच 31 मार्चपर्यंत मालमत्ता कर भरण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. सरत्या आर्थिक वर्षात मालमत्ता करवसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी करनिर्धारण आणि संकलन खात्याने विविध उपाययोजना केल्या आहेत. करवसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी करनिर्धारण आणि संकलन विभागाने अतिशय सूक्ष्म पद्धतीने नियोजन केले आहे. विभागीय स्तरावर कार्यालयीन दिवशी, तसेच सुट्टीच्या दिवशी करदात्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन करवसुलीचे काम सुरू आहे. समाजमाध्यमांद्वारे संपर्क साधून, तसेच गृहनिर्माण संस्थेतील सदनिकानिहाय करवसुलीचे काम सुरू आहे. करदात्यांनी 31 मार्च 2024 पर्यंत कराचा भरणा करावा यासाठी त्यांना ध्वनिक्षेपक, ठळक बॅनर, तसेच स्थानिक केबलद्वारे जनजागृती करून प्रोत्साहित करण्यात येत आहे. शुक्रवारी 28 मार्च 2024 दुपारी 3 वाजेपर्यंत 2 हजार 398 कोटी रुपये कर वसूला झाला. जकात रद्द केल्यानंतर पालिकेकडे मालमत्ता कर आणि विकास नियोजन हे दोन महत्त्वाचे उत्पन्नाचे स्राोत उरले आहेत. तसेच जकातीपोटी नुकसानभरपाईतूनही पालिकेला उत्पन्न मिळते.
मालमत्ता करातून पालिकेला दरवर्षी सहा हजार कोटींचे उत्पन्न मिळते. मालमत्ता कराच्या दरात दर पाच वर्षांनी सुधारणा करण्याची महापालिका कायद्यात तरतूद आहे. करोनामुळे व निवडणुका होतील या अंदाजामुळे ही सुधारणा गेली तीन वर्षे होऊ शकलेली नाही. त्यामुळे मालमत्ता करातून मिळणार्या उत्पन्नात वाढ होऊ शकली नाही. चालू आर्थिक वर्षात (2023-24) ही सुधारणा होईल असे पालिका प्रसासनाला अपेक्षित होते. त्यामुळे पालिकेने चालू आर्थिक वर्षात 6000 कोटींचे उत्पन्न मिळेल असे गृहीत धरले होते. मात्र ही सुधारणा यंदाही झाली नाही. त्यामुळे मालमत्ता कराच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे. त्यातच या वर्षी देयकांचा वाद झाल्यामुळे गेल्या वर्षी इतके उत्पन्न मिळवणेही पालिकेला मुश्कील होणार आहे. सन 2022-23 या गेल्या आर्थिक वर्षात 7000 कोटींचे उत्पन्न मालमत्ता करात ग्राह्य धरण्यात आले होते. मात्र कररचनेत सुधारणा न झाल्यामुळे अखेर उद्धिष्ट 4800 कोटी सुधारित करण्यात आले होते. गेल्या वर्षी 31 मार्च 2023 पर्यंत 5,575 कोटींची वसुली झाली होती. तर चालू आर्थिक वर्षात 6000 कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र मालमत्ता कर देयके देण्यास विलंब झाल्यामुळे 6000 कोटींचे लक्ष्य कमी करून 4500 कोटी करण्यात आले आहे. 1 जानेवारी 2022 पासून मुंबईत पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या निवासी सदनिकांना संपूर्ण करमाफी दिल्यामुळे 16 लाख मालमत्ताधारकांना त्याचा लाभ झाला, मात्र पालिकेचे उत्पन्न 350 ते 400 कोटींनी कमी झाले आहे.
COMMENTS