कोणत्याही निवडणुका या जिंकण्यासाठीच लढायच्या असत्या, त्या लढाईमध्ये आपली ताकद किती आहे, यासाठी लढायचे नसते, तर त्या लढाईतून विजयाचे सूत्र मांडायच
कोणत्याही निवडणुका या जिंकण्यासाठीच लढायच्या असत्या, त्या लढाईमध्ये आपली ताकद किती आहे, यासाठी लढायचे नसते, तर त्या लढाईतून विजयाचे सूत्र मांडायचे असते, मात्र त्याचा विसरच महाविकास आघाडीला पडल्याचे दिसून येत आहे. कारण 2014, 2019 त्यानंतर पुन्हा 2024 च्या लोकसभा निवडणुकीला काँगे्रस तोच कित्ता गिरवण्याची शक्यता आहे. 2019 पेक्षा काँगे्रसची ताकद नक्कीच वाढली असेल, मात्र ती जिंकू शकते, हा आत्मविश्वासच या पक्षाने गमावल्याचे दिसून येत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे वंचितला सोबत घेण्याने महाराष्ट्रात एका वेगळे राजकीय समीकरण बघायला मिळू शकले असते. मात्र आपल्या काही जागा वंचितला सोडण्याची मानसिकता न दाखवता त्या जागा पराभूत झालो तरी चालेल, मात्र आपणच त्या लढल्या पाहिजे ही मानसिकता आघाडीला खड्डयात घेऊन जाणारी असल्याचे दिसून येत आहे.
देशामध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर युती आणि आघाड्या मोठ्या प्रमाणावर होतांना दिसून येत असल्या तरी महाराष्ट्रात मात्र युती आणि आघाड्यांचे घोडे मात्र अडल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम असल्याचा सारखा प्रचार आघाडीकडून करण्यात येत होता. शिवाय वंचितमुळे महाविकास आघाडीच्या किमान 10 जागांना तरी फटका बसल्याचे दिसून येत होते. असे असतांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आघाडीमध्ये समाविष्ट होण्यासाठी इच्छूक होते. मात्र त्यासाठी ते थेट काँगे्रसच्या राष्ट्रीय नेत्यांशी बोलण्यास इच्छूक होते, मात्र राज्यपातळीवर काँगे्रसच्या कोणत्याही नेत्याने पुढाकार घेतला नाही, परिणामी ही बोलणी पुढे जाऊ शकली नाही. कालांतराने ठाकरे यांची शिवसेना आणि वंचित यांनी आपण युती करत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे वंचित ठाकरे यांच्या शिवसेनेचा भाग आहे की, महाविकास आघाडीचा भाग आहे, यात स्पष्टता नव्हती. त्यानंतर जस-जसे राजकारणाचे वारे बदलत गेले, तपास यंत्रणांनी अनेक नेत्यांना तुरूगांत टाकले, त्यावेळेस महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला वंचितला सोबत घेण्याचे स्वप्न पडू लागले. त्यानंतर मग जागा वाटपांचा तिढा. ज्या शिवसेनेत उभी फूट पडली आहे, ज्या ठाकरे गटासोबत किती विद्यमान खासदार आहे, याचा विचार केला तर, तेच ठाकरे गट महाविकास आघाडीमधून सर्वाधिक जागांवर लढतांना दिसून येत आहे. याउलट वंचित आघाडीला केवळ 3 जागा देणार असल्याचे त्यांच्या बैठकीत ठरले होते,
तसा खुलासाच अॅड. आंबेडकर यांनी करत आपण ही युती तोडत असल्याचे त्यांनी दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट केले. त्यामुळे महाविकास आघाडीतून अधिकृतरित्या वंचित बाहेर पडली आहे. असे असले तरी, वंचितने पुन्हा चर्चेचे दार उघडे ठेवले आहे. वंचितने जरी महाराष्ट्रात 48 नव्हे किमान 40 ठिकाणी जरी आपले उमेदवार जाहीर केले, तरी त्याचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो. मात्र त्याचे भान महाविकास आघाडीतील नेत्यांना नसल्याचे दिसून येत आहे. महायुतीमध्ये 2019 च्या निवडणुकीतील सर्वाधिक विजयी उमेदवार असल्याचे दिसून येत आहे. तरीदेखील महायुतीमध्ये चौथा भिडू अर्थात मनसेला सोबत घेण्यास इच्छूक असल्याचे दिसून येत आहे. मनसेला सोबत घेण्याचे प्रमुख कारण म्हणजे मनसेचा मुंबईमध्ये असलेला मतदार. त्यामुळे मनसेला सोबत घेतल्यामुळे महायुतीला मुंबईतील 6 जागा जिंकण्यास मदतच होईल असा विश्वास महायुतीला आहे, मात्र पराभूत झालेल्या महाविकास आघाडीला तसा आत्मविश्वास नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणात युती आघाड्यांचे राजकारणातील तिढा कायम बघायला मिळू शकतो. कारण राजकारणामध्ये आणि पक्षांपक्षामध्ये सरंजामदारपद्धती वाढतांना दिसून येत आहे. त्यामुळे आपलाच पक्ष सर्वाधिक जागा निवडून आला पाहिजे, भलेही त्या जागा पराभूत झाल्या तरी चालतील असाच या पराभूत पक्षांची मानसिकता दिसून येत आहे.
COMMENTS