अकोला ः राज्यात मराठा आरक्षणाचा लढा तीव्र झाला असतांनाच, दुसरीकडे ओबीसी समूहाचे एल्गार मेळावे मोठ्या प्रमाणावर निघतांना दिसून येत आहे. यावर माध्य
अकोला ः राज्यात मराठा आरक्षणाचा लढा तीव्र झाला असतांनाच, दुसरीकडे ओबीसी समूहाचे एल्गार मेळावे मोठ्या प्रमाणावर निघतांना दिसून येत आहे. यावर माध्यमांशी बोलतांना वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मराठा आरक्षणाचा जीआर अजून फायनल झालेला नाही. या अध्यादेशावर 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. त्यानंतरही अध्यादेश फायनल झाला तरी तो कायदेशीर प्रक्रियेत जाणार आहे. कारण ओबीसींचा त्याला मोठा विरोध आहे. या प्रकरणात ओबीसी आणि मराठा हे दोन्ही गट सहजासहजी ऐकणार नाही, त्यामुळे हा अध्यादेश कायदेशीर प्रक्रियेत अडकणार असल्याचे आंबेडकरांनी म्हटले आहे.
यावेळी बोलतांना आंबेडकर म्हणाले की, मराठा समाजाची गेल्या 70 वर्षांतील सत्यपरिस्थिती पाहावी लागेल. मराठा समाजात नेहमीच दोन गट राहिले आहेत. आज ज्यांना निजामी मराठे म्हटले जाते, तो मुघलांबरोबर राहिला होता. जे आज आरक्षण मागत आहेत, ते रयतेमधील मराठे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते. या दोघांमध्ये जात हा समान दुवा असला आणि मावळ्यांनी मोगलाई मराठ्यांना स्वीकारले असले तरी त्यांनी रयतेच्या मराठ्यांना स्वीकारले असे नाही, असे मोठे विधान देखील आंबेडकरांनी केले आहे. रयतेचे मराठे आणि मोगलाई मराठे यांच्यात आजही रोटी-बेटी व्यवहार होत नाही. यांच्यात सामाजिक एकत्रीकरण झालेले नाही. त्यामुळे गरीब मराठ्यांना वेगळे काढले जाऊ शकते का? तर तशी शक्यता आहे. पण त्यासाठी सत्ता हाती लागेल आणि त्यामुळेच जनतेने आम्हाला सत्ता द्यावी, असे आवाहन आम्ही करत आहोत, असेही आंबेडकर म्हणाले. छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाला आवाहन करून मराठा समाजावर बहिष्कार घालण्याची भाषा केली. त्याचा आंबेडकरांनी निषेध केला. ओबीसी आणि मराठा समाजाच्या नेत्यांमध्ये कटुता आलेली आहे. हे नाकारून चालणार नाही. पण कोणत्याही समाजाचा नामोल्लेख करून अजून भांडण वाढवणे, ही वृत्ती अतिशय घातक आहे. मी त्याचा निषेध करतो, असेही आंबेडकरांनी यावेळी म्हटले आहे.
COMMENTS