मुंबई : इंग्रजी शाळांचे पेव गेल्या काही दशकांपासून फुटल्यानंतर त्या पाठोपाठ खासगी शिकवणी वर्गाचे देखील पेव फुटले आहे. मात्र केंद्र सरकारने नुकतीच
मुंबई : इंग्रजी शाळांचे पेव गेल्या काही दशकांपासून फुटल्यानंतर त्या पाठोपाठ खासगी शिकवणी वर्गाचे देखील पेव फुटले आहे. मात्र केंद्र सरकारने नुकतीच खासगी शिकवण्यासाठीची नियमावली जाहीर केली असून, त्यानुसार आता केंद्र शासनाने दहावीच्या खालील किंवा 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांना खासगी शिकवणीस प्रवेश देण्यास मनाई केली आहे.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, विविध स्पर्धा आणि प्रवेश परीक्षांच्या तयारीच्या नावाखाली वाढलेली खासगी शिकवण्यांची दुकानदारी आणि मनमानी कारभारावर अंकूश ठेवण्यासाठी केंद्राने शिकवण्यांसाठी नियमावली जाहीर केली आहे. स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी राजस्थानमधील कोटासह देशभरातील अनेक शहरे खासगी शिकवण्यांसाठी प्रसिद्धीस पावत आहेत. विद्यार्थ्यांना उसंत न देता, काळ वेळ न पाहता परीक्षेसाठी घोकंपट्टीचा रेटा लावणार्या शिकवण्यांच्या कारभारावर सातत्याने टीकाही होत असते. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे या शिकवण्यांचा कारभार गेल्या दोन वर्षांपासून अधिक चर्चेत आहे. त्याबाबत खासदारांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर अखेर केंद्राने खासगी शिकवण्यांना नियमावलीच्या चौकटीत बांधण्याचा प्रयत्न केला आहे. या नियमावलीनुसार आता इयत्ता पहिलीपासून सुरू असलेले शिकवणी वर्ग बंद करावे लागण्याची शक्यता आहे. शिकवण्यांनी आठवड्याची सुट्टी देणे, तसेच सण, उत्सवांच्या कालावधीत सुट्टी देणे बंधनकारक आहे. सुट्टीच्या दिवशी कोणतीही परीक्षा घेण्यात येऊ नये, असेही या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.
शिकवण्या बंद होण्याची शक्यता – दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या किंवा वयाची 16 वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाच आता शिकवणी वर्गाला प्रवेश देता येणार आहे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमाला पूरक ठरणार्या शिकवण्या बंद होण्याची शक्यता असून दहावीनंतर देता येणार्या प्रवेश आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीपुरताच शिकवण्यांचा आवाका राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर किमान पदवी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच शिक्षक म्हणून नियुक्त करता येईल. त्याचबरोबर प्रत्येक शिकवणी वर्गाने समुपदेशाची नियुक्ती करणे आवश्यक आहे.
COMMENTS