जैन साधु-साध्वींना एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी विहार (जाणे-येणे) करण्याची मुभा असावी, अशी मागणी अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघाच्या अल्पसंख्याक समितीचे उपप्रमुख यश शहा यांनी केली आहे.
अहमदनगर/प्रतिनिधी- जैन साधु-साध्वींना एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी विहार (जाणे-येणे) करण्याची मुभा असावी, अशी मागणी अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघाच्या अल्पसंख्याक समितीचे उपप्रमुख यश शहा यांनी केली आहे. राज्यामध्ये 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने जैन साधू-साध्वींच्या येण्या-जाण्यास प्रतिबंध येणार आहे, असाही दावा त्यांनी केला आहे.
यासंदर्भातील निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. सर्व संत समाजाला, मनुष्याला जगण्याची चांगली दिशा देतात, मार्गदर्शन करतात. धार्मिक संत व मुख्यत्वे जैन साधू-साध्वी भगवंत हे धार्मिक कारणासाठी, समाजात मानवता, अहिंसा, शांती निर्माण होण्यासाठी तसेच धार्मिक प्रचारासाठी संपूर्ण भारतभर एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाण्यास पूर्णपणे फक्त पायी विहार (पदभ्रमण) करीत असतात. त्यांच्याबरोबर अतिशय निवडक 2-3 सेवक त्या दरम्यान सोबत असतात. ते सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 4 ते 6.30 दरम्यान पायी विहार करीत असतात. त्यांनी संसाराचा त्याग केला असल्याने त्यांचा आहार हा गोचरी (भिक्षा) स्वरूपात घेण्यासाठी जवळील रहिवासी भागात त्यांना जावे लागते. अनेक साधु-साध्वी आज विहार करीत आहेत. पण संचारबंदीच्या नवीन निर्णयाने त्यांना विहारादरम्यान अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यांची राहायची व गोचरीची सोय होऊ शकणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय जैन श्वेतांबर गुजराती समाज महासंघाच्यावतीने राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र शाह यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे अल्पसंख्याक समिती उपप्रमुख यश शहा यांनी ई-मेलद्वारे निवेदन राज्यपाल कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक आदींना पाठवले आहे. तसेच सर्व संबंधित कार्यालयांशी संपर्क करून साधू-साध्वींना सहकार्य करावे, कुठेही त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, आवश्यकता असल्यास त्यांना पोलीस संरक्षण विहार दरम्यान द्यावे, अशी मागणीही केली आहे.
—
चौकट
वळसेंनी मदतीची दिली ग्वाही
शहा यांनी याबाबत गृहमंत्री वळसे यांच्याशी संपर्क साधून विहार करणार्या साधु-साध्वींना त्रास होऊ नये, अशी मागणी केली. त्यावेळी त्यांनी, यासाठी संपूर्ण सहकार्य करण्यात ये़ईल, असे शहा यांना सांगितले तसेच शक्य असल्यास साधु-साध्वींनी आहे त्या ठिकाणी थांबावे आणि सर्वांनी काळजी घ्यावी, अशी विनंती त्यांना करावी, असे आवर्जुन सांगितले. तसेच साधु-साध्वींसह सर्वधर्मीय धर्मगुरूंना कोविड लस तातडीने देण्याबाबतही संबंधिताशी बोलू, असे त्यांनी सांगितल्याचे शहा म्हणाले.
COMMENTS