Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेडमध्ये मृत्यूचे तांडव सुरूच

24 तासांमध्ये दगावले 15 रुग्ण

नांदेड/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून नांदेडमधील शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरूच असून, अजूनही हे मृत्यूचे तांडव संपण्याची चिन्हे नाही

सिद्धेश काळेची थाळी फेक क्रीडा स्पर्धेसाठी निवड
मनोज जरांगे यांच्या दौर्‍याचा चौथ्या टप्पा 1 डिसेंबरपासून
देवेंद्र फडणवीसांनंतर आता या भाजप मंत्र्यांनी दिला ‘मी पुन्हा येईन’ चा नारा

नांदेड/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून नांदेडमधील शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरूच असून, अजूनही हे मृत्यूचे तांडव संपण्याची चिन्हे नाहीत. कारण गेल्या 24 तासांमध्ये 15 रुग्ण दगावल्याने राज्य सरकार आणि आरोग्य विभाग या रुग्णालयाची यंत्रणा अजूनही ताळ्यावर आणू शकले नसल्यामुळे जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या 15 रुग्णांमध्ये यात 6 अर्भक, 2 बालकांचा समावेश. गेल्या 7 दिवसांत 83 मृत्यूची नोंद झालीय. त्यात 37 अर्भक आणि बालकांचा समावेश आहे. आतापर्यंत गेल्या सात दिवसात एकूण 83 जणांचा मृत्यू झाला असून यात 37 अर्भकांसह लहान बालकांचा समावेश आहे.
या शासकीय रुग्णालयात औषधाचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले होते. या घटनेनंतर राज्य सरकारच्या विरोधात टीकेची झोड उठली होती. विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, यांनी या रुग्णालयाला भेट देत सरकारवर निशाणा साधला होता. परंतु या रुग्णालयातील मृत्यूचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. या रुग्णालयात 24 तासात पुन्हा 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. शासकीय रुग्णालयात औषधी पुरवठा करणार्‍या हाफकीनने औषधी खरेदी बंद केली आहे. यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. दरम्यान अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधे पुरवठा होत नसल्याने जीव गमवावा लागत असल्याची माहिती देण्यात आली होती. दरम्यान या सर्व प्रकरणावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. तर उच्च न्यायालयानं देखील सरकारला खडेबोल सुनावले आहे. राज्यात आरोग्य सेवेवर मनुष्यबळ कमतरतेचे दडपण आहे असे उत्तर देऊ नका, अशा शब्दात महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांची कानउघडणी न्यायालयाने केली. राज्य सरकार या नात्याने जनतेला मूलभूत सेवा पुरवणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

सात दिवसांत 83 रुग्णांचा मृत्यू
2 ऑक्टोबर ः 24 रुग्णांचा मृत्यू
3 ऑक्टोबर ः 7 रुग्णांचा मृत्यू
4 ऑक्टोबर ः 6 रुग्णांचा मृत्यू
5 ऑक्टोबर ः 14 रुग्णांचा मृत्यू
6 ऑक्टोबर ः 11 रुग्णांचा मृत्यू
7 ऑक्टोबर ः 6 रुग्णांचा मृत्यू
8 ऑक्टोबर -15 रुग्णांचा मृत्यू

आरोग्य यंत्रणा ताळ्यावर आणण्यात अपयश – नांदेड शासकीय रुग्णालयांची आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाली असून, याठिकाणी दररोज रुग्णांचे मृत्यू होत असतांना, याठिकाणी अतिरिक्त डॉक्टरांची संख्या वाढवणे, नर्सची संख्या वाढवणे, औषधसाठा जलदगतीने पाठवणे, रुग्णांची वर्गवारी करून, त्यांना अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची होती. मात्र गेल्या सात दिवसांपासून आरोग्य यंत्रणा अजूनही ताळ्यावर येवू शकलेली नाही. त्यामुळे अजून किती जणांचे बळी जाणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

COMMENTS