पुणे/प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याने रविवारी तुरुंग
पुणे/प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याने रविवारी तुरुंगात आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पुण्यातील येरवडा कारागृहात आरोपी पप्पू शिंदेने गळफास घेवून आपले जीवन संपवले आहे.
कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणात कोर्टाने मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर आता यातील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे यांने पुण्यातील येरवडा कारागृहात आत्महत्या केली आहे. त्यामुळे पुण्यात खळबळ उडाली असून या प्रकरणाचा उच्चस्तरीय तपास होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटेच्या सुमारास कोपर्डी प्रकरणातील आरोपी पप्पू शिंदेने गळफास लावून आत्महत्या केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने पप्पू शिंदेला दोषी ठरवले होते. आरोपीला 3 वर्षे सक्तमजुरी, जन्मठेप, हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी 2017 साली आरोपी पप्पू शिंदेला शिक्षा सुनावली होती. परंतु याच आरोपीने आत्महत्या केल्याने पुण्यातील येरवडा कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्हे उपस्थित होत आहे. आरोपी पप्पू शिंदे याने 12 जुलै 2016 रोजी दोन साथीदारांसह नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे एका शाळकरी मुलीवर बलात्कार करत तिची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातून अटक केली होती. त्यानंतर वर्षभर चाललेल्या सुनावणीनंतर अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. कोपर्डीच्या घटनेनंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा संघटनांकडून निषेध मोर्चे काढण्यात आले होते. त्यामध्ये कोपर्डीतील मुलीच्या कुटुंबियांना न्याय आणि मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली होती. शालेय मुलीवर निर्दयीपणे अत्याचार करून राक्षसी वृत्तीने तिचा खून केला, ही घटना कोणाही सामान्य माणसाला संताप आणणारी होती. त्यामुळेच आरोपी नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ यांच्यावर न्यायालयाच्या जुन्या इमारत परिसरात दोनदा हल्ला झाला होती. तर न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या आवारात ‘शिवबा’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सशस्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.
COMMENTS