संगमनेर/प्रतिनिधीः संगमनेरच्या सहकार विश्वाला बदनाम करणार्या तब्बल 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी पोलिसांनी बँकेच्या मुख्य आरोपींपैकी व्यवस्थ
संगमनेर/प्रतिनिधीः संगमनेरच्या सहकार विश्वाला बदनाम करणार्या तब्बल 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी पोलिसांनी बँकेच्या मुख्य आरोपींपैकी व्यवस्थापकाला अटक केली आहे. राजकीय वरदहस्त असलेला मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याच्यासह अन्य आरोपी अद्यापही फरार आहेत. पोलिस आरोपींच्या मागावर असल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली.
संगमनेरच्या पतसंस्था विश्वातील सर्वात मोठ्या तब्बल 81 कोटीच्या अपहार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत बँकेच्या तीन कॅशियरसह लेखापरीक्षकाला अटक केली होती. त्यांना येत्या 24 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर आता पोलिसांनी बँकेचा व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ याला अटक केली आहे. गुंजाळ याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. गुंजाळ हा या गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपीपैकी एक आरोपी आहे. पतसंस्थेतील हा घोटाळा काही ठराविक व्यक्तीभोवती केंद्रित झाला आहे.
संस्थेचा अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे, व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ, चीफ अकाउंटंट भाऊसाहेब संतू गायकवाड यांच्यासह सतरा जणांनी तब्बल 80 कोटी 79 लाख 41 हजार 981 रुपयांचा अपहार केला असून, याप्रकरणी त्यांना सहा आरोपींनी मदत केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अहमदनगरचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक राजेंद्र फकीरा निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय, सन 2016 ते सन2021 पर्यंत संस्थेत कार्यरत असलेले चार लेखापरीक्षक, दोन वैधानिक लेखापरीक्षक अशा तब्बल 21 जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अध्यक्ष त्यांच्या नातेवाईकासह बहुतांशी आरोपी फरार झाले असून, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नाशिक येथून अमोल प्रकाश क्षीरसागर याला तर संगमनेरमधून गणपत कुटे, उल्हास रावसाहेब थोरात, सोमनाथ कारभारी सातपुते या तिघांना अटक केली होती. भाऊसाहेब दामोदर कुटे, भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ, भाऊसाहेब संतु गायकवाड, चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज, दादासाहेब भाऊसाहेब कुटे, संदीप भाऊसाहेब कुटे, अमोल भाऊसाहेब कुटे, विमल भाऊसाहेब कुटे, शकुंतला भाऊसाहेब कुटे, अमोल कृषी सेवा केंद्र (सोनाली दादासाहेब कुटे), अमोल ट्रेडिंग कंपनी (दादासाहेब भाऊसाहेब कुटे), श्री डेव्हलपर्स (संदीप भाऊसाहेब कुटे), कृष्णराव श्रीपतराव कदम, प्रमिला कृष्णराव कदम, अजित कृष्णराव कदम, सुजित कृष्णराव कदम, संदीप दगडू जरे या सतरा जणांनी तब्बल 80 कोटी 79 लाख 41 हजार 981 रुपयांचा अपहार केला असून, याप्रकरणी त्यांना लहानु गणपत कुटे, उत्तम शंकर लांडगे उल्हासराव साहेब थोरात सोमनाथ कारभारी सातपुते या कॅशियर सह अरुण बुरड व अमोल शिरसागर या सहा जणांनी मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलिस फरार असलेल्या आरोपींच्या मागावर आहे.
COMMENTS