उंडाळे भागातील शेतकर्‍यांचा पाणी प्रश्‍न सहकार पॅनेलने मार्गी लावला

Homeमहाराष्ट्रसातारा

उंडाळे भागातील शेतकर्‍यांचा पाणी प्रश्‍न सहकार पॅनेलने मार्गी लावला

उंडाळे भागातील शेतकरी सभासदांच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आमच्या काळात विशेष प्रयत्न करण्यात आले.

अमृत महोत्सवी वर्ष आणि विकासाचा आलेख
Aaurngabad : औरंगाबाद शहरात हिंदू दलित महासंघाची चर्चासत्र व बैठक संपन्न
नागवडे कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी विजय मुथा व रमजान हवालदार यांची निवड

जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या उंडाळे येथील प्रचारसभेत डॉ. सुरेश भोसले यांचे प्रतिपादन
कराड / प्रतिनिधी : उंडाळे भागातील शेतकरी सभासदांच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आमच्या काळात विशेष प्रयत्न करण्यात आले. शेतकरी सभासदांच्या मागणीनुसार कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून वाकुर्डे योजनेची थकीत वीजबिलाची एकूण 15 लाख 80 हजार रुपये इतकी रक्कम भरण्यात आली. त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांना पाणी उपलब्ध झाले. येत्या काळात या भागातील शेतकर्‍यांचा पाणी प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी सहकार पॅनेलच्यावतीने विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली. जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्यावतीने उंडाळे विभागातील सभासद मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर सहकार पॅनेलचे उमेदवार दयानंद पाटील, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील, संचालक पांडुरंग होनमाने, माजी संचालक श्रीरंग देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, गेल्या सहा वर्षात आम्ही शेतकर्‍यांच्या उसाला चांगला दर दिला आहे. सरासरी हा दर 3000 रुपये इतका आहे. आम्ही पारदर्शक व नियोजनबध्द कारभार केला. कृष्णा कारखाना एक कुटुंब आहे, या विचाराने काम आम्ही केले. येत्या काळातही कृष्णा कारखाना शेतकरी सभासद हिताचे अनेक उपक्रम राबविणार आहे. तसेच कारखान्याची गाळप क्षमता 9000 मे. टनावरून 12,000 मेट्रिक टन वाढविण्याचा आमचा मानस आहे. जयवंत आदर्श योजना अधिकाधिक शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे.
यावेळी सहकार पॅनेलला पाठिंबा जाहीर करताना पंजाबराव पाटील म्हणाले, डॉ. सुरेशबाबांनी आपल्या अथक प्रयत्नातून कृष्णा कारखाना चांगल्या पध्दतीने चालविला आहे. ऊसाला चांगला दर देऊन शेतकर्‍यांचे हित साधले असून, सभासदांनी सहकार पॅनेलच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे.
मारूती शेवाळे यांनी प्रास्तविक केले. संजय शेवाळे यांनी आभार मानले. यावेळी जिंतीचे सरपंच जयवंत शेवाळे, म्हारूगडेवाडीचे उपसरपंच अजित महारूंगडे, घोगावचे उपसरपंच निवास शेवाळे, मनवचे उपसरपंच दादासो शेवाळे, डॉ. सुरेश पाटील, पंकज पाटील, सतीश पाटील, अशोक पाटील, आण्णासो शेवाळे, रामचंद्र भावके, पै. सचिन बागट, काशीनाथ पाटील, डी. एस. पाटील, हणमंतराव थोरात, सर्जेराव थोरात यांच्यासह सभासद उपस्थित होते.

COMMENTS