Homeताज्या बातम्यासंपादकीय

राष्ट्रवादी नेमकी कुणाची ?

राष्ट्रवादी काँगे्रसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार हयात असतांनाच, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी या पक्षावर दावा ठोकत भाजपसोबत सत्तेत हातमिळवणी

टोलवरून खडाजंगी
सीमावर्ती भागातील गावांच्या विकासाचा प्रश्‍न
नव्या शैक्षणिक धोरणाची उपयुक्तता

राष्ट्रवादी काँगे्रसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार हयात असतांनाच, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी या पक्षावर दावा ठोकत भाजपसोबत सत्तेत हातमिळवणी केली आहे. एकीकडे शरद पवार या बंडखोरांच्या विरोधात प्रचारसभा घेत महाराष्ट्र पिंजूून काढत असतांना, या बंडखोरांनी आपल्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी नेमकी कुणाची याचे उत्तर आता कदाचित निवडणूक आयोगच देईल, यात शंका नाही. शरद पवार हयात असतांना, त्यांनाच बाजूला करून, त्यांच्याच पक्षावर दावा ठोकणे, याला काय म्हणावे ? एखाद्या कुटुंबप्रमुखाने आयुष्यभर खस्ता खावून, एखादे छानसे घर बांधावे, कुटुंबप्रमुख म्हणून आपल्या मुलांचे संगोपन करावे, त्यांना चांगल्या पदावर नोकर्‍या, काम-धंदा मिळवून द्यावे, आणि उद्या त्याच कुटुंबांतील सदस्यांनी कुटुंबप्रमुखांना घराबाहेर काढावे आणि कुटुंबांतील सदस्यांनी आम्ही बहुमताने निर्णय घेतला आहे, असे उलट सांगावे असाच काहीसा प्रकार राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये दिसून येत आहे. आपल्या कुटुंबांमध्ये काही विश्‍वासू आणि प्रामणिक सदस्य असतात, त्यांच्यावर विश्‍वास असतो, म्हणून त्यांच्यावर प्रमुख जबाबदार्‍या आपण सोपवत असतो, मात्र याच विश्‍वासू साथीदारांनी जेव्हा घर फोडून दुसर्‍यासोबत संसार थाटला. त्यावरून या सर्व संघर्षाची परिणिती दिसून येते. वास्तविक पाहता शिवसेनेची जी गत झाली, तशीच गत राष्ट्रवादीची होण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाने दुसरे पक्ष कार्यालय थाटले आहे. जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली आहे, त्यांच्या जागाी सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे हा संघर्ष वाढत जाणार आहे, यात शंका नाही. प्रफुल्ल पटेल यांनी तर शरद पवार आम्हाला पदावरून हटवू शकत नाही, अशी भूमिका जाहीर केली आहे. त्याचबरोबर यामध्ये विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाची भूमिका महत्वाची राहणार आहे. निवडणूक आयोग कुणाला राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष म्हणून मान्यता देतो, यावर पुढील गणिते अवलंबून असणार आहे. त्याशिवाय राज्यात आगामी गणिते बघता, विधानसभा अध्यक्ष, काय निर्णय देतात, त्यावर या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येवू शकेल. मात्र अजित पवारांनी शिंदे गटाचा कित्ता गिरवल्यामुळे आपल्यालाच पक्ष आणि चिन्ह मिळले असा दावा अजित पवार करत असेल, तर त्यांना वर्षभर दिलासा मिळले, मात्र जनतेच्या न्यायालयात त्यांना न्याय मिळेल असे नाहीच. राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर ज्या काही घडामोडी होतील, त्या सांगता येणार नाही. कारण सत्तेत गेलेले पुन्हा माघारी आपल्या घरी परतले तर नवल वाटायला नको. कारण आज सत्ता भाजपच्या हाती असल्यामुळे यांना ईडी, सीबाीआय, आयकर यांची भीती आहे. त्यामुळे आपले बुड शाबूत राहण्यासाठी या सर्वांनी सत्तेचा सोपान मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे आज सुपात असले तरी, उद्याही सुपात असतील अशी शक्यता कमीच आहे. खरंतर शरद पवारांनी यासंदर्भातील एक महत्वाचे विधान केले आहे. ईडी असो की सीबीआय जेव्हा चौकशी तयार करते, तेव्हा त्यांची फाईल तयार असते. भाजपमध्ये पक्षप्रवेश केला म्हणजे या फाईल बंद होतात, असे नाही. त्या फक्त काही काळापुरत्या कपाटात जातात, त्या बंद होत नाही. त्यामुळे यांच्या फाईली सत्ताबदल झाला, किंवा भाजपच्या जेव्हा मनात आले तेव्हा या फाईल ओपन होवू शकतात, त्यामुळे आजचा तुरुंगावास उद्यावर ढकलण्याचा हा प्रकार आहे. मात्र यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल होतांना दिसून येत आहे.

COMMENTS