Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जलयुक्त शिवारातून शेतकर्‍यांचे सक्षमीकरण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन फ्लॅगशिप कार्यक्रमांची गतीने अंमलबजावणी करण्याचे प्रशासनाला निर्देश

अहमदनगर/प्रतिनिधी ः जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात अहमदनगर जिल्ह्याने 651 कोटी रुपये खर्च करत 1 हजार 35 गावांमधून 32 हजार कामांद्वारे

शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई महावितरणने थांबवली
अखेर फडणवीसांची निर्दोष मुक्तता
तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, कळणार नाही

अहमदनगर/प्रतिनिधी ः जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात अहमदनगर जिल्ह्याने 651 कोटी रुपये खर्च करत 1 हजार 35 गावांमधून 32 हजार कामांद्वारे 2 लक्ष 98 हजार हेक्टर जमीन संरक्षित सिंचनाखाली आली आहे. या अभियानामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादकता वाढून शेतकर्‍यांचे सक्षमीकरण करण्यात यश मिळाल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जलयुक्त शिवार अभियानाच्या टप्पा 2 मध्ये जिल्ह्यातील 257 गावांची निवड करण्यात आली आहे. टप्पा दोन मधील कामे करताना लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेऊनच अंतिम आराखडा तयार करावा. तसेच गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेमध्ये लोकसहभाग वाढवत कामांना अधिक गती देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध योजनांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. बैठकीस राज्याचे महसूल, पशुसंवर्धन,दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार सुजय विखे-पाटील आमदार बबनराव पाचपुते, आमदार प्रा.राम शिंदे, आमदार श्रीमती मोनिकाताई राजळे, आमदार प्राजक्त तनपुरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.

राज्यातील जनतेच्या हितासाठी राज्य शासनामार्फत अनेक फ्लॅगशिप कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या सर्व कार्यक्रमांची प्रशासनाने गतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जिल्ह्याने उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रशासनाचे कौतुक करत उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आता मोदी आवास योजना सुरू करण्यात येत आहे.  या योजनेसह शबरी, रमाई, प्रधानमंत्री आवास योजना एकत्रित करून 10 लाख घरे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार जिल्ह्याने त्यांचे उद्दिष्ट वाढवून समाजातील सर्व घटकांना न्याय देऊन पात्र गरजूंना लाभ देण्यासाठी मोहीम राबवावी, असेही ते यावेळी म्हणाले. सर्वसामान्यांना विविध दाखल्यांसाठी शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागू नयेत यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम  राबविण्यात येत आहे. दोन महिन्यात जनतेपर्यंत मोठ्या प्रमाणात त्यांच्यासाठीच्या योजना पोहोचवायच्या असुन जिल्ह्याचे दीड लक्ष दाखले वाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. सौर कृषि वाहिन्यांचा पथदर्शी प्रकल्प सर्वप्रथम अहमदनगर जिल्ह्यात राबविण्यात आला आहे. कृषीवाहिन्या या शंभर टक्के सौर कृषि वाहिन्यांमध्ये करण्यासाठी जिल्ह्यात मोठा वाव आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याचे आवाहन करत याद्वारे शेतीला दिवसा विनाव्यत्यय वीज देता येणार आहे. सरकारी जमिनी उपलब्ध नसणार्‍या गावात शेतकर्‍यांच्या पडीक जमिनी भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. या जमिनीला महावितरणमार्फत प्रति एकर, प्रतिवर्ष 50 हजार रुपये भाडे दिले जाणार असल्याने मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेच्या अंमलबजावणीसाठी वेगाने कार्यवाही करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या नुकसानीपोटीची रक्कम शासनाकडून देण्यात आली आहे. ही रक्कम येत्या 10 दिवसांमध्ये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासनाला यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

33 के व्ही. च्या चार उपकेंद्रांचे लोकार्पण – जनतेला योग्य दाबाने व अखंडितपणे विजेचा पुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून विद्युत विकासावर ही भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील चार 33 के.व्ही. उपकेंद्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. यामध्ये राहुरी तालुक्यातील खडांबे, कानडगाव, अकोले तालुक्यातील खीरविरे व जामखेड तालुक्यातील नायगाव या चार उपकेंद्रांचे लोकार्पण करण्यात आले. या चारही उपकेंद्राच्या माध्यमातून सुमारे 11 हजार 500  नागरिकांना सुरळीत व अखंडितपणे विजेचा पुरवठा होणार आहे.

युपीएससीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव – लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील नऊ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले. यामध्ये  अभिषेक दुधाळ, मंगेश खिलारी, सागर खर्डे, डॉ. शुभांगी सुदर्शन केकान-पोटे, प्रशांत इंगळे, श्रुती कोकाटे, स्वप्निल डोंगरे, राजश्री देशमुख, महारुद्र भोर  या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

COMMENTS