Homeताज्या बातम्याधर्म

धम्म गौतमाचा

आज वैशाखी पौर्णिमा अर्थात  बुद्ध पौर्णिमा तथागत गौतम बुद्धांची जयंती. अत्यंत मंगलमय दिन. जन्म , सम्य संम्बोधी, महापरिनिर्वाण ह्या वृक्ष सानि

फडणवीस यांचे नेतृत्व आता केंद्रातही !
शेतकऱ्यांनी ड्रॅगन फळाची शेती करावी शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत आवाहन
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

आज वैशाखी पौर्णिमा अर्थात  बुद्ध पौर्णिमा तथागत गौतम बुद्धांची जयंती. अत्यंत मंगलमय दिन. जन्म , सम्य संम्बोधी, महापरिनिर्वाण ह्या वृक्ष सानिध्यातील तिन्ही घटनांचे एकाच दिनी वैशाख पौर्णिमेला झालेले उदाहरण जगातील एकच महापुरुष तथागत बुद्धांचे आहे. निसर्गनियमानुसार मानवी जीवन संवर्धनासाठी तथागताचा नैसर्गिक बुद्धधम्म हा कार्यकारणभावाचा विज्ञाननिष्ठ सिद्धांत लोककल्याणकारी आहे. म्हणूनच तथागत बुद्ध हे जगातील पहिल्या क्रमांकाचे महान वैज्ञानिक ठरल आहेत. बुद्ध पौर्णिमेनिमित्त धम्म गौतमाचा या लेखातून बुद्ध धम्माचा मांडलेला लेखाजोखा…….. 

इ.स.पूर्व  563 च्या वर्षातील वैशाख पौर्णिमेस सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. एक राजपुत्र असूनही त्याने वयाच्या 29 व्या वर्षी राजवैभव त्यागले. हा असा एक शाक्य तरुण होता. ज्याने बहुमत विरोधात असतानाही आपला युद्ध न करण्याचा आग्रह सोडला नाही. त्याबदल्यात त्याने गृहत्यागाची शिक्षा स्विकारली. वयाच्या 35 व्या वर्षी जगातील मानवाच्या दु:खमुक्तीचा मार्ग शोधला आणि पुढे वयाच्या 80 व्या वर्षापर्यंत एकूण 45 वर्षे महान अशा प्रज्ञेची आणि करुणेची शिकवण बहुसंख्य लोकांना दिली. हा आशिया खंडाचा प्रकाश असलेला महापुरुष म्हणजे तथागत  गौतम बुद्ध होय !

बुद्धांनी भिक्खूसंघ निर्माण केले. त्या काळात लिहिण्याची कला अस्तित्वात नव्हती, जेष्ठ भिक्खूंनी बुद्धांचा उपदेश तोंठपाठ केला व स्मरणात ठेवला. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर विद्वान भिक्खूंनी चर्चा करुन तो उपदेश जतन केला .पुढील काळात जेव्हा लिहिण्याची कला अवगत झाली तेव्हा त्यामध्ये टिका टिप्पणी व स्पष्टीकरण यांची भर घातली. अशारितीने ‘तिपिटक’ हा ग्रंथ तयार झाला. सुत्तपिटक, विनयपिटक व अभिधम्मपिटक हे तीन भाग तयार आहेत.

इ.स.पूर्व चौथ्या शतकात मौर्याचे जगातील एक मोठे साम्राज्य उदयास आले.उत्तरेस हिमालयापासून दक्षिणेस विंध्यपर्वतापर्यंत आणि पूर्वेस बंगालच्या उपसागरापासून पश्चिमेस हिंदुकुश पर्वतापर्यंत ते साम्राज्य पसरले होते. मौर्य काळातील तिसरा राजा सम्राट अशोक हा होता. इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात त्याने मौर्य साम्राजाचा आणखी विस्तार केला. कलींग युद्धात तो विजयी झाला. परंतु युद्धात झालेला रक्तपात पाहून त्याचे मन व्याकूळ झाले. इ.स.पूर्व 260 मध्ये त्याने बुद्धधम्म स्विकारला. त्याने गया येथे बोधीवृक्षाजवळ महाविहार बांधले. धम्मप्रचारासाठी स्तंभ उभारले, शिलालेख कोरले आणि धम्ममहामात्र या अधिकाऱ्यांना राज्याच्या सीमेबाहेर सर्व दिशांना पाठविले. पश्चिमेस सिरीया व इजिप्तपर्यंत हे धम्म प्रचारक पोहोचले. त्याचा पुत्र महेंद्र व कन्या संघमित्रा यांना श्रीलंकेला धम्मप्रचारासाठी पाठविले. तेथे बुद्धधम्म प्रचलीत झाला.

भारतात इ.स.पूर्व पहिल्या शतकापासून सातव्या शतकापर्यंत बुद्धधम्माची वाढ झाली. अजिंठा, कार्ले, कान्हेरी यासारखी अनेक कोरीव लेणी खोदली गेली. नालंदा तक्षशिलासारखी विद्यापीठे अस्तित्वात आली. हा वारसा इतका मोठा आहे की, अजूनही भारतात काही ठिकाणी उत्खननात या संस्कृतीचे अवशेष सापडत आहेत. हीनयान पंथ म्यानमार व श्रीलंका येथे प्रचलित होता, तर महायान पंथ चीन व जपान या देशात प्रचलित झाला. चीनमध्ये इ.स.दुसऱ्या शतकात बुद्धधम्म पोहोचला. तेथे सुमारे अठराशे वर्षे बौद्धग्रंथाचे भाषांतर केले गेले. सातव्या शतकात तिबेटमध्ये बुद्धधम्म पोहोचला. अकराव्या शतकात तेथे बौद्धग्रंथाचे भाषांतर करण्यात आले. सहाव्या शतकात जपानमध्ये बुद्धधम्म पोहोचला.सुमारे पंधराशे वर्षे हा धम्म अस्तित्वात आहे. जपानी लोक महान बौद्ध संस्कृतीच्या लाटेत न्हाऊन निघाले आहेत. तेथील मंदिरे ही समाजकेंद्र बनली आहेत.तर धर्मगुरु हे ज्ञानाचे नेत बनले आहेत.

बुद्धांची शिकवण कोरियन, जपानी, सिंहली, तुर्की, कम्बोडियन या भाषांबरोबरच लॅटीन, फ्रेंच, इंग्रजी, जर्मन आणि इटालियन भाषांमध्ये भाषांतरीत झाली आहे. अशारितीने बुद्धांची समानतेची शिकवण संपूर्ण जगाच्या पाठीवर पोहोचली.

विसाव्या शतकात बुद्धधम्माच्या इतिहासातील एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे भारतात बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धधम्माचे केलेले पुनरुज्जीवन ही होय. दि.4 डिसेंबर 1954 रोजी रंगून (बर्मा) येथील भाषणात ते म्हणतात, ‘भारतातून बुद्धधम्म जरी शून्यवत झाला असला तरी बुद्धाचे नाव येथे मोठ्या आदराने घेतले जाते आणि त्याच्या धम्माची आठवण अजूनही ताजे आहे. हे धम्माचे झाड कोमजले आहे. पण त्याची मुळे जिवंत आहेत. बुद्धधम्म या भूमीतला मूळ धम्म आहे. तो बाहेरच्या देशातून येथे आलेला नाही. तेव्हा आपल्याला या धम्माला परत आणावयाचे आहे. एवढेच करणे आपल्यासाठी आवश्यक आहे.’

त्यानंतर 12 मे 1956 रोजी मुंबईतील बुद्धजयंतीच्या भाषणात डॉ.बाबासाहेब म्हणाले, ‘बुद्धधम्माच्या ऱ्हासाची कारणे ध्यानात घेऊन त्या धम्माची गळती होऊ नये म्हणून आवश्यक ती सर्व काळजी मी घेतली आहे. ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ लिहिला आहे. त्यामुळे आता येथून पुढे बुद्धधम्माची लाट कधीही परतणार नाही. ‘नवधर्मांतरीतांसाठी कायमचा सोबती’ असे वर्णन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे केले आहे. बुद्धाच्या धम्माचे हेच विशाल रुप पाहून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे पाच लाख लोकांना बुद्धाच्या धम्माची दीक्षा दिली. धम्म हा केवळ मानवाच्या शांतीसाठी, उत्कर्षासाठी व उत्साहासाठी आहे म्हणून त्यांनी धम्माचा विचार केला आणि स्विकारला. जगाला तारण्याची ताकद फक्त बुद्धांच्या धम्मातच आहे म्हणून बुद्धांचे तत्वज्ञान जगाला पटवूनही सांगितले.

बुद्धाचा मार्ग चोखाळणारा सम्राट अशोक जगाचा दैदिप्यमान राजा ठरला. ऐतिहासिक महापुरुष ठरला. यशस्वी प्रशासक ठरला. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर युगपुरुष, युगप्रर्वतक, विश्वरत्न, प्रकांड पंडित ठरले. शेवटी ते बुद्धचरणी नतमस्तक झाले. त्यांना अख्ख्या जगाने स्विकारले. त्यांची किर्ती जगभर पसरली. आजही जग त्यांची आठवण करतांना दिसते. म्हणून जगाला ‘युद्ध’ नाही तर ‘बुद्ध’ हवा आहे. 

गुरु तु जगाचा… बुद्ध भगवंता

जोडितो हात मी … नमवितो माथा ..धृI

मिळविले तू.. इथे निर्वाण

दु:खाचे तू… शोधिले कारण

कायमची तू.. मिटवली चिंता….

जगावे कसे हे.. तुच शिकविले

सत्य जगाला… तूच दाखविले

सम्यक संबुद्ध… तुच अरहंता…

स्वयंदीप हो हे.. तूच सांगणारा 

तुझा धम्म माणसाला … जगी तारणारा

तूच जगज्जेता… तूच मार्गदाता…

तुझा शिलमार्ग.. आहे सद्गुणांचा 

खरा तोच ठरला .. पूर्ण मानवाचा

संजय गुण गाई… तुझे गुणवंता….

विश्वरत्न जगतगुरु तथागत बुद्ध, त्यांचा धम्म व संघाला

माझे कोटी कोटी वंदन.

COMMENTS