Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बुलेटस्वारांचा ’फटाका’ बंद; पोलिसांनी 5 लाखांच्या सायलेन्सरवर फिरवला रोलर

लातूर प्रतिनिधी - शहरासह जिल्ह्यात फटाका सायलेन्सर वापरणार्‍या वाहनधारकांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून, कर्णकर्कश आवाज करीत सुस

अकोल्यातील अपघातामध्ये चौघांचा मृत्यू
गौतमी पाटील गावात येणार म्हणून सुट्टी हवी, एसटी चालकाचा अर्ज व्हायरल
लातूरची एसटी सुसाट; ’मे’ महिन्यात 2 कोटींचा नफा !

लातूर प्रतिनिधी – शहरासह जिल्ह्यात फटाका सायलेन्सर वापरणार्‍या वाहनधारकांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून, कर्णकर्कश आवाज करीत सुसाट धावणार्‍या वाहनधारकांना लगाम लावण्यासाठी लातूर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. लातुरात कारवाई करण्यात आलेल्या जवळपास 500 वाहनांचे सायलेन्सर पोलिसांनी जप्त केले. संबंधित वाहनधारकांविरोधात दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या पाच लाखांच्या फटाका सायलेन्सरवर पोलिसांनी थेट रोलर फिरवत ते नष्ट केले.
पोलिसांकडून वारंवार सूचना देण्यात येऊनही काही हौसी वाहनधारकांकडून फटाका, कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर वापरले जात आहेत. याबाबत लातूर शहर वाहतूक शाखा आणि विविध पोलिस ठाण्यांच्या कर्मचार्‍यांकडून कारवाई केली जात आहे. या कारवाईनंतरही काही वाहनधारक मूळ सायलेन्सर वापरत नसल्याचे दिसून आले. अखेर गत महिनाभरात लातूर पोलिसांनी विविध मार्गांवर वाहन तपासणी करून फटाका (मॉडिफाय) सायलेन्सर जप्त केले. या जप्त केलेल्या सायलेन्सरबरोबरच त्या-त्या वाहनधारकांना हजारो रुपयांचा दंडही करण्यात आला. काहींवर थेट न्यायालयात खटलाही दाखल करण्यात आला आहे. सण-उत्सव काळात काढण्यात येणार्‍या दुचाकी रॅलीत अशा फटाका सायलेन्सर असलेल्या दुचाकींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याचे आढळून आले आहे. पोलिस अशांवर तातडीने कारवाई करीत आहेत. मात्र, काही वाहनधारक पोलिसांच्या या कारवाईला जुमानत नसल्याने पोलिसांनी आता धडक मोहीम होती घेतली आहे. महिनाभरात तब्बल 500 पेक्षा अधिक सायलेन्सर जप्त केले आहेत. लातूर पोलिसांनी जप्त केलेल्या तब्बल पाच लाखांच्या फटाका सायलेन्सरवर सोमवारी रोलर फिरवत ते नष्ट केले. डांबरी रस्त्यावर एका ओळीत सायलेन्सर ठेवून त्यावरून रोलर फिरविण्याची कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचा व्हिडीओ लातूर पोलिसांच्या ट्विटरवर अपलोड करण्यात आला आहे. या कारवाईने फटाका सायलेन्सर वापरणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. मिरवणूक, दुचाकी रॅलीसह लातुरात फटाका सायलेन्सर वापरणार्‍यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यांना जवळपास तीन लाखांवर दंड करण्यात आला आहे. दंड नाही भरला तर त्यांच्याविरोधात थेट न्यायालयातून नोटीस काढली जाते. फटाका सायलेन्सर वापराल तर खबरदार… थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

COMMENTS