दरेकरांमुळे ठाकरेंना कोकणात जावे लागले…; भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा दावा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दरेकरांमुळे ठाकरेंना कोकणात जावे लागले…; भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा दावा

अहमदनगर/प्रतिनिधी-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरग्रस्तांच्या भेटीसाठी कोकणात गेल्याने त्यांचे अभिनंदन. पण याबाबत खरे अभिनंदन विधान परिषदेचे विरोधी पक्ष

शेतकर्यांसाठी कृषि विद्यापीठ, कृषि विभाग व महाबीज यांनी एकत्र येवून काम करावे- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील
अहमदनगर मध्ये मोहरम विसर्जन मिरवणूक होणार नाही| LokNews24
गुन्ह्यातील जप्त किमती मुद्देमाल ठेवणार बँक लॉकरमध्ये…; जिल्हा पोलिसांचा विचार सुरु, नियमावली केली जाणार

अहमदनगर/प्रतिनिधी-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरग्रस्तांच्या भेटीसाठी कोकणात गेल्याने त्यांचे अभिनंदन. पण याबाबत खरे अभिनंदन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन व निरंजन डावखरे यांचे केले पाहिजे. ते आधी कोकणात दरड कोसळून उदध्वस्त झालेल्या तळीये गावात मदतीसाठी पोहचल्याने मुख्यमंत्र्यांना तेथे जावे लागले, असा दावा प्रदेश भाजपच्या उपाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी शनिवारी येथे केला. दरम्यान, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब हे पळकुटे आहेत, रत्नागिरीत पावसाने हाहाकार मांडला असताना व तेथे मदतीसाठी ठाण मांडून बसणे गरजेचे असताना परब मुंबईला पळून आले, असा आरोपही वाघ यांनी केला. नगरमधील काही पिडीत कुटुंबांच्या भेटीसाठी वाघ नगरला आल्या होत्या. गांधी मैदानातील भाजप कार्यालयात शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शहर उपाध्यक्ष संतोष गांधी, स्थायी समितीचे माजी सभापती नरेंद्र कुलकर्णी, ज्ञानेश्‍वर काळे, अमित गटणे, ऋग्वेद गंधे आदी यावेळी उपस्थित होते. राज्य सरकारवर टीका करताना वाघ म्हणाल्या, कोकणातील पूरग्रस्तांना मदत देण्याची गरज असताना कोठे झाड पडले, कोठे रस्ता बंद आहे वा अन्य काही कारणे प्रशासकीय यंत्रणा देत असताना या अडचणींवर मात करून विरोधी पक्ष नेते दरेकर, महाजन व डावखरे कोकणात पोहोचले व त्यांनी मदत कार्य सुरू केले. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे कोकणात गेले यात नवल नाही. उलट, दरेकर-महाजन-डावखरे यांच्यामुळे त्यांना जावे लागले, असे सांगून त्या म्हणाल्या, पंढरपूरला मुख्यमंत्री स्वतः ड्रायव्हींग करीत जसे गेले, तसे त्यांनी कोकणातही ड्रायव्हींग करीत जावे, असे आमचे म्हणणे होते. पण विरोधी पक्ष तेथे पोहोचल्यावर त्यांना तेथे जावे लागले. आता राज्यातील सर्वज्ञानी (संजय राऊत) नेहमीप्रमाणे केंद्र सरकारने मदत द्यावी, असे म्हणत आहेत व म्हणणारही आहेत. पण, त्याआधीच केंद्र सरकार अशी मदत देणारही आहे व जाहीरही केली आहे. पण राज्य सरकार काय करणार, हे सर्वज्ञानींनी सांगितले पाहिजे. निसर्ग व तोक्ते चक्रीवादळाची मदत असून कोकणवासीयांना मिळालेली नाही, त्यामुळे आताच्या पूर संकटाची मदत कधी देतील काही सांगता येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

रोज सांगावे लागते
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करीत आहेत. पण एकमेकांना सांभाळतही आहेत. बलात्कारी मंत्र्याला वाचवण्यासाठी त्यांच्यात एकी होते. पण शेतकरी प्रश्‍नांसाठी, दूध दर वाढीसाठी, महिलांवरील अन्याय-अत्याचार रोखण्यासाठी त्यांची एकी होत नाही. फक्त स्वार्थासाठी ते एकत्र येतात व त्यांच्यापैकी कोणीना कोणी रोज माध्यमांसमोर येऊन सांगते की त्यांचे सरकार पाच वर्षे टिकणार आहे म्हणून. जर सरकार टिकणारच आहे तर मग सांगण्याची गरज काय आहे? केवळ स्वतःला दिलासा देण्यासाठी ते असे सांगत आहेत, असा दावा करून वाघ म्हणाल्या, नाना पटोले काही बोलत असतात, त्यावर बाकीचे बोलतात, कोणी त्यांना लहान म्हणते तर कोणी आणखी काही..सारा तमाशा सुरू आहे. या सरकारला कोणी तरी चांगले म्हणते काय?, असा सवालही त्यांनी केला.
वारकरी कोविड नियम पाळून वारी करू, असे सांगत असतानाही त्यांना परवानगी दिली नाही. हा भगव्याचा व वारीचा अपमान आहे. वारकर्‍यांना गुन्हेगारांसारखी दिलेली वागणूक वारकरी विसरणार नाहीत. त्यांनी (शिवसेना) त्यांचे हिंदुत्व टांगून ठेवले असले तरी आम्ही नाही, असे सांगून वाघ म्हणाल्या, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब आहेत, पण तेथे उदय सामंत बादशहासारखे वागतात व आता पूर स्थितीत लोकांची घरे पाण्यात असताना परब यांनी तेथे थांबण्याऐवजी ते मुंबईत पळून आले. ते पळकुटे आहेत, अशी टीका वाघ यांनी केली. दरम्यान, ईडी वा सीबीआय या स्वायत्त संस्था आहेत व कोणी काहीतरी केले असेल म्हणूनच या संस्थांद्वारे कारवाई होते. पण केंद्र सरकार हे करते असा अपप्रचार सुरू आहे. भाजप काळातील जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीला आम्ही आक्षेप घेतला नाही, असेही वाघ यांनी आवर्जून सांगितले.

त्याची ब्रेकींग होते, यातच सारे आले…
मुख्यमंत्री ठाकरे मंत्रालयात आल्याची ब्रेकींग बातमी होते, यातच सारे काही आल्याचे सांगून वाघ म्हणाल्या, मुख्यमंत्री वर्षा व मातोश्रीच्या बाहेर पडतच नाहीत. त्यामुळेच ते मंत्रालयात आल्याची ब्रेकींग न्यूज होते. खरे तर मंत्रालयात येणे हे त्यांचे कामच आहे. पण ते जेथे त्यांच्याच मंत्र्यांना भेटत नाहीत, तेथे त्यांचे मंत्रालयात येणे ब्रेकींगच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

ते चांगलेच, पण…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सदगृहस्थ आहेत. पण ते ज्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसले व त्यावर बसल्यावर त्यांनी काही निर्णय घेतले व अनेक निर्णय घेतलेच नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांच्या या भूमिकेवर बोलतो. इतिहासात पहिल्यांना एका आयपीएस अधिकार्‍याने आधीच्या गृहमंत्र्यांवर आरोप केला आहे. हे सरकार बलात्कार्‍यांना राजाश्रय देत आहे, पोलिस तक्रार घेत नाही म्हणून आम्हाला जनहित याचिका दाखल करावी लागते, यावर मुख्यमंत्री उत्तर देत नाहीत. गृह, सार्वजनिक बांधकाम, परिवहन व अन्य सर्व खात्यांचे प्रमुख मुख्यमंत्रीच असतात. त्यामुळेच त्यांच्या कार्यपद्धतीवर बोलावे लागते, असेही वाघ यांनी स्पष्ट केले.

COMMENTS