साधारणतः तीस वर्षांपूर्वी मुंबई भाग बाजारात हर्षद मेहता घोटाळा उघडकीस आला होता. १९९२ ची ही घटना. त्यानंतर अवघ्या ९ वर्षांपूर्वी केतन पारेख याचाह
साधारणतः तीस वर्षांपूर्वी मुंबई भाग बाजारात हर्षद मेहता घोटाळा उघडकीस आला होता. १९९२ ची ही घटना. त्यानंतर अवघ्या ९ वर्षांपूर्वी केतन पारेख याचाही त्याच पध्दतीचा घोटाळा समोर आला. मात्र, या दोघांचे घोटाळे समोर येताच त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली होती; आणि त्यांना न्यायालयात शिक्षाही झाली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सेबी’ने आपल्या नियमात खूप बदल घडवले. परंतु, आता अमेरिकेतील हिंडेनबर्ग या संशोधन संस्थेने अदानी एंटरप्राइज आणि अदानी उद्योग समूहाच्या संदर्भात बाहेर आणलेल्या संशोधन अहवालातून, मेहता आणि पारेख यांच्यासारखीच मोडस् ऑपरेंडी असल्याचे सिद्ध दिसून आले. जागतिक श्रीमंतांच्या यादीत दुसरे स्थान काबिज करण्याच्या तयारीत असणाऱ्या गौतम अदानी यांना, अवघ्या एका रात्रीत श्रीमंतांच्या यादीत सातव्या क्रमांकावर यावे लागले. आता तर जगातल्या पहिल्या दहा मधून ते बाहेर पडले आहेत. याचाच अर्थ त्यांची श्रीमंती ही फक्त सूज होती. २१८ बिलियन अमेरिकन डॉलर एवढी संपत्ती असणाऱ्या गौतम अदानी यांच्या संपत्तीचे आजचे मूल्य अवघे ९२ बिलियन डॉलर राहिले आहे. येणाऱ्या काही दिवसात ती देखील कमी कमी होत जाईल,
असा संकेत त्यांनी काल रात्री अतिशय धुमधडाक्यात आणलेला एफ पी ओ, मध्यरात्री अचानक भाग बाजारातून मागे घेण्याची घोषणा करण्यात दिसून आले. आपली उरली सुरली पतही वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. अदानी यांची भाग बाजारातील कार्यपद्धती पाहता ते आपल्याच जगभरातल्या इतरत्र उघडलेल्या कंपन्यांच्या नावाने भाग खरेदी करायचे आणि मग त्याचे भाव वाढवायचे. भाग बाजारात वाढलेल्या भावात ते पुन्हा विक्री करून प्रचंड पैसा कमवायचा, अशी कार्यपद्धती जोपासली. ज्या कंपन्या हे भाग खरेदी करतात, त्या कंपन्या मुळातच अस्तित्वात नसतात; अशी भयावह अंधकारमय बाजू यापूर्वीच अदानी यांच्या समूहाविषयी समोर आली आहे. परंतु याहीपेक्षा, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एखाद्या उद्योगाचा, व्यक्तीचा किंवा संस्थेचा खोटारडेपणा किंवा गुन्हे सदृश्यस्थिती जेव्हा समोर येते, तेव्हा, त्या व्यक्ती, संस्था यांच्या अपराधीपणाच्या भावनेमुळे ते पुढच्या कार्यपद्धती अवलंबित नसतात. परंतु, अदानी याला मात्र अपवाद ठरल्याचे दिसतात. कारण अमेरिकेच्या हिंडेनवर्गने त्यांच्या खोटेपणाचा डंका पिटूनही ज्या पद्धतीने त्यांनी अदानी एंटरप्राईजेस चे एफपीओ बाजारात आणले, ते पाहता त्यांना आपल्या कार्यपद्धती विषयी जराही संकोच वाटलेला नाही.
याचा अर्थ त्यांची मानसिकता आर्थिक उलथापालथी मध्ये किंवा लोकांची आर्थिक फसवणूक करण्यामध्ये किती निर्ढावलेली आहे, हे देखील यानिमित्ताने स्पष्ट होते. काल रात्री अचानक त्यांनी भाग बाजारातील आपले एफपीओ मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर आता त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे. त्याच वेळी त्यांचा विदेशी विजा देखील जप्त करण्यात यावा, अशी भूमिका आता पुढे आली आहे. कारण, एका व्यक्तीमुळे जर देशाचा श्रीलंका होत असेल तर, अशावेळी ती व्यक्ती कितीही मोठी असो अथवा सरकारचा त्या व्यक्तीला कितीही मोठा छुपा पाठिंबा असो पण देशातल्या संवैधानिक आणि स्वायत्त संस्थांनी त्या व्यक्ती विरोधात आपली भूमिका चोख बजावली पाहिजे ही आज भारतीय लोकांची जनभावना आहे. देशातील अतिशय मोठ्या सार्वजनिक वित्तीय संस्था ज्या जनतेच्या पैशावर उभ्या आहेत; किंबहुना त्यामध्ये जनतेचाच पैसा आहे. त्यांनी अशा फ्राॅड व्यक्तिमत्त्वावर आर्थिक शिस्तीचा बडगा कठोरपणे उगारायला हवा.
COMMENTS